(मुंबई)
कोरोना काळात प्रवासी संख्या घटल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला होता. मात्र एसटीने २०२० नंतर पहिल्यांदाच ५७ लाख प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला आहे. २०२२ च्या जानेवारी महिन्यात दररोज सरासरी फक्त ३ लाख प्रवाशांची ने-आण करणारी एसटी आता तब्बल सरासरी ५७ लाख प्रवाशांची ने-आण करीत आहे.
लग्नसराई व शालेय मुलांना उन्हाळ्याची सुट्टी असल्याने प्रवासी एसटी महामंडळावर चांगला विश्वास दाखवत आहेत. महामंडळानेही जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर उतरविल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. ८ मे रोजी विक्रमी २९ कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या दोन निर्णयामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना प्रवासात तिकिटामध्ये ५० टक्के सवलत लागू करण्यात आली. त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढत आहे. बस गाड्यांची कमतरता, वाहनांच्या सुट्या भागांचा अभाव, डिझेलचे वाढते दर, जुन्या झालेल्या बस, नादुरुस्त बसचे वाढते प्रमाण अशा अनेक अडचणींवर मात करत एसटी आता चांगली वाटचाल करत आहे.