(निवोशी-गुहागर/उदय दणदणे)
गुहागर तालुक्यातील वेळंब तेलीवाडी येथील कु. दुर्वेश प्रविण रहाटे वय ७ वर्ष हा जन्मतः दिव्यांग असून त्याचं जिल्हा शासकीय रुग्णालयात रत्नागिरी (सिव्हिल हॉस्पिटल) येथे सिव्हिल सर्जन डॉ. फुले मॅडम यांच्या आरोग्य टीमकडून त्याच्या पूर्ण शरीराची तपासणी करून त्याला दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे व कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या वारसांना शासनाच्यावतीने मदत मिळावी यासाठी वेळंब गावचे पोलीस पाटील श्री स्वप्नील तुकाराम बारगोडे हे सातत्याने पाठपुरावा करत होते.
कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या वारसांना शासनाकडून मदत प्राप्त होण्यासाठी एकूण पाच प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवले होते. त्यातून वेळंब घाडेवाडी येथील श्रीमती सुनंदा गोविंद घाडे वय ६५ वर्षे यांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला होता. तिच्या वारसांना शासनाच्या निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रस्ताव सादर केला होता. अखेर वेळंब गावचे पोलीस पाटील श्री स्वप्नील बारगोडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून कै. सुनंदा गोविंद घाडे यांच्या वारसाला आर्थिक मदत ५०००० (पन्नास हजार रुपये) त्यांच्या वारसाच्या बॅंक अकाउंटला जमा झाले आहेत.
पोलीस पाटील श्री स्वप्नील बारगोडे यांनी आपल्या वेळंब गावासाहीत आजूबाजूच्या गावातही कोरोनात मृत्यू झालेल्या वारसांना शासनाकडून मदत मिळावी याकरीता प्रयत्न करत कै.शांताराम खांबे यांची वारस पत्नी नर्मदा शांताराम खांबे वेळंब- पांगारी, कै. सुनंदा गोविंद घाडे यांचा वारस मुलगा सुनिल गोविंद घाडे – वेळंब, कै.यशवंत विश्राम माळी यांची वारस पत्नी -श्रीमती सुमित्रा यशवंत माळी- वेळंब, कै.शांताराम गोविंद घाडे यांची वारस पत्नी श्रीमती वनिता शांताराम घाडे – वेळंब, कै.नारायण तानाजी गावडे यांचा वारस मुलगा सचिन नारायण गावडे – जामसुत असे पाच प्रस्ताव मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत मिळावी म्हणून प्रशासनाकडे पाठवण्यात आले होते.
त्यापैकी श्रीमती नर्मदा शांताराम खांबे (वेळंब -पांगारी) श्री सुनील गोविंद घाडे (वेळंब) श्री सचिन नारायण गावडे (जामसुत) या वारसांच्या नावे बँकेत प्रत्येकी ५००००(पन्नास हजार रुपये) जमा झाले असून श्रीमती वनिता शांताराम घाडे- वेळंब (घाडेवाडी) आणि श्रीमती सुमित्रा यशवंत माळी (वेळंब) या दोन अर्जदारांना मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे व कलेक्टर कार्यालयात जाऊन चौकशी करण्यात आली आहे असे वेळंबचे पोलिस पाटील स्वप्नील बारगोडे यांनी सांगितले.
श्रीमती सुमित्रा यशवंत माळी यांचे सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे सुनावणी लावण्यात आली होती. आम्ही सविस्तर कागदपत्रांची पूर्तता केली असून सदर बाबत केलेल्या चौकशीत आम्ही समाधानकारक माहिती दिली असून सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडूनही आम्हाला उत्तम सहकार्य मिळत आहे. त्यामुळे बाकी राहिलेल्या अर्जदारांचीही मदत त्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होईल, अशी महत्वपूर्ण माहिती वेळंब गावचे पोलीस पाटील श्री स्वप्नील बारगोडे यांनी दिली. गावच्या सर्वांगिण विकासासाठी अग्रेसर असणारे श्री स्वप्नील बारगोडे आपल्या पोलीस पाटील पदाचा पदभार सांभाळत गावात शांतता प्रस्थापित होण्याबरोबरच शासकीय योजनांची माहिती प्रत्येक घर-वाडी वस्तीवर देत निराधार व विधवा पेंशन योजना, दिव्यांग योजना, संजय गांधी वृद्धपकाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभार्थी योजना, आपल्या वेळंब गावात सक्षमपणे राबवत आहेत. त्यांच्या या सेवाभावी समाज कार्याची सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.