(नवी दिल्ली)
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये इतकी वाढ झाली आहे की चीनच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. चीनसोबतच जपान आणि अमेरिकेतही कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
चीन, जपान आणि अमिरिकेत कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता भारत सरकारही सतर्क झाले आहे. जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेतील कोविड-१९ प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील, अशी माहिती दिली गेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज (बुधवारी) सकाळी 11 वाजता बैठक घेतील. याआधी काल आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विषाणूच्या नवीन स्वरूपाचे निरीक्षण करण्यासाठी संक्रमित आढळलेल्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंगग वाढविण्याचे आवाहन केले होते.