(नवी दिल्ली)
देशभर हळूहळू कोरोना हात पाय पसरू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून तर देशात कोरोनाचा संसर्ग अचानक वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत मनसुख मांडवीय यांनी कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक आरोग्याची तयारी आणि राज्यांसोबत कोविड-१९च्या लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी मनसुख मांडवीया यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्यांनी सहकार्याच्या भावनेने काम करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या मागच्या लाटेवेळी असंच काम केलं गेलं होतं. मात्र या बैठकीतून समोर आलेली महत्त्वाची बाब म्हणजे मास्क अनिवार्य करण्यात आलेला नाही. तसेच राज्यांना कोविड टेस्टिंग आणि जिनोम सिक्वेंसिगबाबत लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.
त्यांनी सांगितले की, कोविडच्या नियंत्रणासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, लसीकरण आणि नियमांचे पालन या पंचसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी ८ आणि ९ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि जनआरोग्य अधिकाऱ्यांसोबत तयारीचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
या बैठकीत राज्यांना १० आणि ११ एप्रिल रोजी सर्व आरोग्य केंद्रांवर मॉक ड्रिल करण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच केंद्राकडून राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना या मॉक ड्रिलचं निरीक्षण करण्यासाठी स्वत: रुग्णालयांचा दौरा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी पूर्णपणे तयार आणि सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याशिवाय राज्यांना आपातकालीन हॉटस्पॉटची ओळख पटवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याबरोबरच कोरोना चाचणी आणि लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. रुग्णालयातील पायाबूत सुविधांची तयारी सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सतर्क राहा, मात्र अनावश्यक भीतीचं वातावरण निर्माण करू नका, असा सल्लाही आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे.