कोरोनाची तिसरी लाट येणार हे निश्चित असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव लहान मुलांना जास्त जाणवेल असेही तज्ज्ञांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही बालरोग तज्ज्ञांशी चर्चा करुन स्वतंत्र टास्क फोर्स ) उभारण्याचे संकेत दिले आहेत. असे असले तरी तिसऱ्या लाटेपूर्वीच लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अनेक घटना पुढे येत आहेत. गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहिली तर पुण्यात गेल्या वर्षभरात सव्वा दोन लाख बालकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १ वर्षाखालील २५३ चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत लहान मुले, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहे.
पुण्यात देशातील पहिले चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात उभारले जाणार आहे. पुण्याप्रमाणेच औरंगाबाद महापालिकेकडूनही लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. औरंगाबादेतील एमजीएम परिसरात १०० खाटांचे कोविड बाल रुग्णालय उभे राहणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद महापालिकेची तयारी सुरू केली आहे. लहान मुलांसोबतच गरोदर मातांसाठीही ५० खाटांचे रुग्णालय उभे केले जाणार आहे.
Post Views: 100