( वैभव पवार, गणपतीपुळे )
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची संख्या घटत आहे. ओमिक्रोन या नव्या विषाणूमुळे दिवसेंदिवस राज्यामध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच राज्य सरकारने जमावबंदी व संचारबंदीबाबत कडक निर्बंध लागू केल्याने पर्यटनावर याचा मोठा परिणाम होत आहे. एकीकडे कोरोनानंतर पर्यटन व्यवसायाचे अर्थचक्र नुकतेच सुरू झाल्यानंतर सर्वच ठिकाणच्या पर्यटन व्यवसायिकांना चांगला दिलासा प्राप्त झाला होता. त्यातच दिवाळी हंगाम अतिशय चांगल्या प्रकारचा गेल्यानंतर आता पुन्हा सर्वच लहानमोठ्या पर्यटन व्यवसायाला उभारी मिळत असताना पर्यटनावर नव्या कोरोना निर्बंधांचे सावट येऊन ठेपले आहे. याचा सर्वाधिक फटका इतर उद्योग- व्यवसायांपेक्षा पर्यटन व्यवसायालाच मोठ्या प्रमाणात बसतो असे चित्र मागील कोरोनाच्या टाळेबंदीपासून दिसून येत आहे.
सध्या गणपतीपुळे पर्यटन क्षेत्रात लॉजिंग, हॉटेल या ठिकाणी कमी प्रमाणात पर्यटक संख्या असताना समुद्रकिनाऱ्यावरील उंट, घोडे, वॉटरस्पोर्ट, ए टिव्ही गाड्या, फोटो व्यवसायिक, शहाळी विक्रेते,सरबत व भेळपुरी विक्रेते आदी सर्वच लहान मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल आता खूपच मंदावली आहे. गणपतीपुळे पर्यटन स्थळाकडे कमी प्रमाणात भाविक व पर्यटक येऊ लागले आहेत. एकूणच सध्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर सुरू असल्याने येणारे तुरळक भाविक व पर्यटक श्रींचे दर्शन घेऊन आणि पर्यटनाचा आनंद लुटून आपल्या परतीच्या मार्गाकडे लागत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे यापुढे पर्यटन क्षेत्र असेच सुरु राहू दे आणि लोकडाऊन होऊ देऊ नको, अशी प्रार्थना आणि साकडे येथील गणराया चरणी सर्व लहान-मोठ्या पर्यटन व्यवसायिकांकडून घातले जात आहे.