तामिळनाडूमध्ये तब्बल 10 वर्षांनी द्रमुकपक्षाची सत्ता स्थापन झाली आहे. द्रमुक पक्षाचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईतील राजभवानामध्ये शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बनावरीलाल पुरोहित यांनी स्टॅलिनला पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथ घेताच मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे.
डीएमकेचे सर्वेसर्वा एमके स्टॅलिन यांनी लगेचच आपला कार्यभार स्वीकारत राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड धारक कुटुंबाला ४ हजार रुपये कोरोना सहाय्यता निधी देण्याची घोषणा केली. स्टॅलिन यांनी या सहाय्यता निधीचा पहिला २००० रुपयांचा हप्ता मे महिन्यात देणार असल्याचे आश्वासन दिले. या व्यतिरिक्त स्टॅलिन यांनी राज्य सरकारच्या राशन कार्डधारकांच्या सल्लग्नित खासगी रुग्णालयामधील करोनावरील उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचीही घोषणाही केली. आज राजभवनात शपथ घेतल्यानंतर स्टॅलिन यांच्या मंत्रीमंडळाने घेतलेला हा पहिला निर्णय आहे.