(कराड)
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा विद्युत प्रकल्प असलेल्या कोयना जल विद्युत केंद्रावर राज्यातील अनेक उद्योग व्यवसाय आधारलेले आहेत. मात्र पाऊस लांबल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्याचा तळ दिसू लागला आहे. त्यामुळे पाण्याअभावी या प्रकल्पाच्या वीजनिर्मितीचा चौथा टप्पा बंद करण्यात आला आहे. जून महिना मध्यावर आला तरीही राज्यात पावसाची अपेक्षित सुरुवात झाली नाही. याऊस लांबणीवर पडल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट ओढवले असून त्याचा मोठा परिणाम कोयना वीजनिर्मिती प्रकल्पावर झाला आहे.
कोयना प्रकल्पातील सगळ्यात मोठा असलेल्या चौथ्या संचातून वीजनिर्मिती बंद झाली आहे. कोयना जलविद्युतचा महत्त्वाचा संच बंद करण्यात आल्याने आता राज्य सरकारी महानिर्मिती कंपनीच्या कोळसाआधारित औष्णिक विजेवरील ताण वाढणार आहे. आतापर्यंत एकूण वीज उत्पादनात ७५ टक्क्यांपर्यंत कोळसाआधारित असलेली वीजनिर्मिती आता ९० टक्क्यांवर नेण्याची वेळ महानिर्मिती कंपनीवर येणार आहे.
कोयना धरणात केवळ ११.७४ टीएमसी पाणीसाठा राहिला आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील बिगर सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला आहे. अर्धा जून महिना उलटला तरी या भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आता पूर्वेकडील सिंचनासाठी आरक्षित केलेल्या पाणीसाठ्याबाबतीत उपसाबंदी व पाणीकपात जाहीर केली आहे. कारण धरणातील पाणीसाठा पूर्वेकडे वापरण्यात येत असल्याने पश्चिमेकडील वीज प्रकल्पाला झळ लागली असून पश्चिमेकडील १ हजार मेगावॉट क्षमतेचा चौथा टप्पा पाण्याअभावी बंद पडला आहे.
सध्या केवळ १८ मेगावॉट क्षमतेचे धरणाचा पायथ्याशी असलेला प्रकल्प चालू आहे. उर्वरित प्रकल्प काही कालावधीसाठी चालू करून बंद ठेवले जात असल्याने लवकरच हे प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लांबलेला उन्हाळा आणि रखडलेल्या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. धरणात सध्या १०.६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा साठा पूर्वेकडील बिगर सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला आहे. धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी प्रतिसेकंद १०५० क्युसेक पाणी देण्याचे चालूच असल्याने धरणात पाण्याचा ठणठणाट झाला आहे.