(वैभव पवार / गणपतीपुळे)
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालगुंड, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड, कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय मालगुंड आणि युवाशक्ती शाखा मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मनामनातील श्रावणसरी या उपक्रमाचे दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी कवी केशवसुत स्मारक मालगुंड याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड यांच्या वतीने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या माध्यमातून मालगुंड व मालगुंड परिसरातील अनेक नव्याने लिहिणाऱ्या व कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या साहित्यप्रेमी व्यक्तींना संधी उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये सहभागी होणार आहेत. या प्रत्येक शाळा, महाविद्यालय यातून प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. यावेळी प्रत्येक स्पर्धकाने मराठी भाषेत स्वतः लिहिलेली ३ ते ४ कडव्याची कविता प्रस्तावना न करता सादर करायची आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सहभागी कवींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून उत्कृष्ट कविता सादर करणाऱ्या दोन कवींना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा साहित्य संमेलनात मान्यवर कवींच्या उपस्थितीत कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर, कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप मालगुंडच्या कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, सचिव विलास राणे, कोमसाप युवाशक्तीचे जिल्हा अध्यक्ष अरुण मोर्ये, मालगुंड शाखेचे युवाशक्ती प्रमुख अमेय धोपटकर यांनी केले आहे. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी विलास राणे – ९४२३२९१०९९, अरुण तुकाराम मोर्ये – ९१७५५२६६६०, अमेय धोपटकर – ८८८८०३३६२१ यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी या सभेला वरील पदाधिका-यासह कवी केशवसुत स्मारक समितीचे सदस्य प्रकाश साळवी, उज्ज्वला बापट यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोमसाप शाखा मालगुंड, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे सदस्य, कर्मचारी मोठया प्रमाणात प्रयत्न करत आहेत.