(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोतवडे सनगरेवाडी येथे दुचाकीच्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना 21 जानेवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. कुमार रणबहादूर बिस्वकर्मा (26, नेपाळ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या अपघातप्रकरणी स्वत:सह इतराच्या दुखापतीस आणि मागील सीटवर बसलेल्या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नेपाळी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल मिने टमट्टा (26, नेपाळ, सध्या शिरगाव आडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल मिने टमट्टा हा आपल्या ताब्यातील दुचाकीवर मयत रणबहादूर बिस्वकर्मा व हरिश उर्फ हस्तबहादूर विरबहादूर बिस्वकर्मा (32, नेपाळ) यांना घेऊन तिवराट ते कोतवडे असा तीन सीट घेऊन जात होता. यावेळी कोतवडे सनगरेवाडी येथील गुरुनाथ घडशी यांच्या घरासमोर आला असता निष्काळजीपणे गाडी चालवून गाडी स्लीप झाली. या अपघातात रणबहादूर बिस्वकर्मा याचा मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी झाला.
स्वत:च्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार कमल टमट्टा याच्यावर भादविकलम 304 अ, 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत