(खेड)
तालुक्यातील अतिरिक्त लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रात दि.३० नोव्हेंबरला हिंदुस्थान कोका- कोला ब्रेव्हरेज प्रा.लि. कंपनीचे भूमिपूजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासगी कार्यक्रम होता. आयोजकांच्यावतीने निमंत्रण न मिळाल्याने आपण भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहू शकलो नाही, अशी भूमिका अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी कोका-कोला कंपनीच्या भूमिपूजनासंबंधी माझ्याशी वैयक्तिक चर्चा केली होती. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे दोन दिवशीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे भूमीपूजन सोहळा दि.२ डिसेंबरला घ्यावा असे आपण पालकमंत्र्यांनी सुचविल्याचे जाधव यांनी सांगितले.
चर्चेच्यावेळी पालकमंत्र्यांनी होकार देऊनही ३० नोव्हेंबरला भूमिपूजन सोहळा आयोजित केला. २ डिसेंबरला भूमिपूजन सोहळा झाला असता तर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे यांच्यासह अन्य उपस्थित राहू शकले असते. भूमिपूजन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पाहिल्यास आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सर्वसामान्य मतदारांनी निवडून दिलेल्या खासदारांच्या नावापूर्वीच माजी पर्यावरण मंत्र्यांचे नाव छापण्यात आले आहे. राजकीय शिष्टाचाराला धरून निमंत्रण पत्रिका काढलेली नसल्याबद्दल जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.
जानेवारीत जिल्हास्तरीय सहकार मेळावा
जिल्ह्यातील सहकार मोठ्या प्रमाणात वाढावा अशी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची इच्छा आहे. यासाठी चिपळूण शहरात जानेवारी महिन्यात जिल्हास्तरीय सहकार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसेपाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, स्थानिक आ. शेखर निकम आदी मान्यवरांना मेळाव्यासाठी निमंत्रित केले जाणार असल्याचे बाबाजीराव जाधव यांनी सांगितले.