(मुंबई)
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फेठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी जाहिरात गेल्या महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती. या लॉटरीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाकडून देण्यात आली आहे.
२१ एप्रिल रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन व आरटीजीएस / एनइएफटीद्वारे लॉटरीसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.सदनिकांसाठी अधिकाधिक अर्जदारांना अर्ज करता यावे, यासाठी सुविधा म्हणून IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय प्रणालीत काही बदल करण्यात आले आहेत.
अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत वापरकर्त्यांना अनुकूलतेसाठी काही महत्वाचे बदल केले आहेत. सदर नवीन बदलानुसार सोडतीतील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र असणे आता बंधनकारक नाही. हे प्रमाणपत्र सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी मिळवणे गरजेचे आहे. सदर सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत ९८४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सदर सोडतीत अर्जदाराचे उत्पन्न दर्शविण्यासाठी आयकर परतावा प्रमाणपत्र प्रणालीमध्ये अपलोड करावे लागते.