(रत्नागिरी)
सर्वसामान्यांसह उच्चभ्रू लोकांची जीवनदायीनी असलेली कोकण रेल्वे आता कात टाकत आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर ६ ते ७ वर्षांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू होते. गेल्या काही महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव -थिवीम या मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. कोकण रेल्वेने आता १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे. या उपक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोकण रेल्वेचे कौतुक करत सर्व टीमचे अभिनंदन केले होते. मुंबई ते रत्नागिरी असे कोकण रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाड्या आणि दिवा-रत्नागिरी पॅसेंजर विद्युत इंजिनावर चालवली जाते. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
आता मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे पासून पहिल्या टप्यात सुरुवातीला दहा गाड्या विजेच्या इंजिनाने चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कोकणवासीयांचा प्रवास प्रदुषणमुक्त आणि वेगवान होईलच तसेच कोकणचे नैसर्गिक सौंदर्य सुद्धा अबाधित राहण्यास मदत होईल. डिझेलवर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या विजेवर सुरू केल्यानंतर तब्बल १५० कोटींची बचत करणे शक्य होणार आहे असा विश्वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
१ मे पासून विजेवर धावनाऱ्या गाड्या…
- मांडवी
- जनशताब्दी
- कोकणकन्या
- मस्त्यगंधा
- नेत्रावती
- मंगला एक्सप्रेस
- मडगाव पॅसेंजर
- मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेस
- दोन राजधानी एक्सप्रेस