(रत्नागिरी / प्रतिनिधी )
कोकण रेल्वे मार्गावर रॉक बोल्डिंगचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ५० हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचे समोर आले आहे. ही घटना २९ मार्च २०२३ रोजी घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोकण रेल्वे मार्गावर रॉक बोल्डिंगचे काम करतात. या कामासाठी त्यांना स्टीलच्या रॉडची गरज असते. रॉडसाठी तक्रारदार यांनी स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाचा ऑनलाईन नंबर प्राप्त केला. २८ मार्च रोजी ऑनलाईन क्रमांकावर फोन करून तक्रारदार यांनी प्रति टन ६२ हजार रूपये स्टील रॉड एवढ्या दराने मिळतील का, अशी विचारणा केली होती. मात्र, समोरील व्यक्तीने त्यांना ६५ हजार रूपये प्रमाण प्रतिटन विक्री होईल, असे सांगितले. दरम्यान २९ मार्च रोजी समोरील व्यक्तिकडून तक्रारदार यांना फोन करण्यात आला. यावेळी ६२ हजार रूपये प्रतिटन मालाची विक्री करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. त्याचे कोटेशन तक्रारदार यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आले. त्याचप्रमाणे तक्रारदार यांच्याकडे १ लाख २४ हजार रूपये पैशाची मागणी करण्यात आली. मालाची पोच ३० तारखेला होईल, असें तक्रारदारांना सांगण्यात आले. समोरील व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी संबंधित व्यक्तीने सांगितलेल्या बँक खात्यावर ५० हजार ‘रूपये जमा केले. ठरल्याप्रमाणे ३० मार्च रोजी मालाची डिलिव्हरी होईल, अशी अपेक्षा तक्रारदार यांना होती. मात्र माल न आल्याने तक्रारदार यांनी कंपनीकडे संपर्क साधला असता कंपनीकडून असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.