(खेड)
कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या सामान्य डब्यातून प्रवास करणारे परप्रांतीय सध्या मुजोर झाले असून धावत्या रेल्वेगाडीच्या अनारक्षित डब्यातून ते बिनधास्त धुम्रपान करण्याचा प्रकार मंगला एक्स्प्रेस मध्ये नुकताच उघडकीस आला. एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्या तालुक्यातील वरवली येथील स्वप्नील यादव या कोकणी प्रवाशाने परप्रांतीयाच्या प्रतापाला रोखत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.
तालुक्यातील वरवली येथील स्वप्निल यादव मंगला एक्सप्रेसच्या सामान्य डब्यातून गुरूवारी खेड ते रत्नागिरी असा प्रवास करत होते. या धावत्या एक्सप्रेसच्या अनारक्षित डब्यात एक परप्रांतीय धुम्रपान करत असल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी त्यास रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या अटकावाला न जुमानता धुम्रपान करणे सुरूच ठेवले. त्यांनी थेट जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांच्याशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता कोकण रेल्वेच्या रत्नागिरी येथील जीआरपी विभागाशी संपर्क साधत या प्रकाराबाबत माहिती दिली. माहिती मिळताच रत्नागिरी येथील रेल्वे पोलीस सतर्क झाले. मंगला एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकात दाखल झाली असता तैनात रेल्वे पोलिसांनी सामान्य डब्यात शिरून धुम्रपान करणाऱ्या परप्रांतीय प्रवाशाला ताब्यात घेतले.