(चिपळूण)
कोकण रेल्वे मार्गावर चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. एर्नाकुलम एक्स्प्रेस या रेल्वे गाडीने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिन्यांसह रोख रक्कम असा ३ लाख ७२ हजारांचा ऐवज चोरट्याने लांबवला. ही घटना २७ रोजी चिपळूण रेल्वेस्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात सोमवारी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एर्नाकुलम एक्स्प्रेस या रेल्वे गाडीने ही महिला तलसेरी ते पुणे असा प्रवास करीत होती. ही रेल्वे गाडी चिपळूण रेल्वेस्थानकात आली असता पर्समध्ये दागिने व रोख रक्कम नसल्याचे लक्षात आले. पर्समधून ३ लाख ६९ रुपये किमतीचे दागिने व ३५ हजार रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.