( रत्नागिरी )
कोकण रेल्वे मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. ४ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आडवली (ता. लांजा) येथे ओहरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे.
अनेक गाड्या दीड ते दोन तासांपेक्षा अधिक काळ विविध रेल्वे स्थानकावर अडकून पडल्या आहेत. मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस संगमेश्वर येथे दीड तासापासून उभी आहे, तर मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस वैभववाडी येथे दीड तासांपासून थांबलेली आहे. मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस दोन तासांपासून रत्नागिरी येथे उभी आहे, तर जनशताब्दी अडीच तासांपासून आडवली येथे थांबवून ठेवण्यात आली आहे.
दरम्यान दुपारी साडेबारा वाजता वायर तुटल्यानंतर लागलीच रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून वायर जोडायचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पुढील एका तासांत रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, असा अंदाज कोकण रेल्वेकडून व्यक्त केला जात आहे. मात्र विविध रेल्वे स्थानकात गाड्या थांबल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. वायर जोडण्याची प्रक्रियेसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असले तरीही आणखी वेळ गेल्यास वेगवेगळ्या समस्यांना कोकण रेल्वेला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.