(राजापूर)
कोकण पदवीधर संघाची निवडणूक महत्वपूर्ण आहे, संघटनेकडून ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल त्याला भरघोस मताधिक्याने विजयी करून कोकण पदवीधर मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकवावा, असे आवाहन शिवसेना (ठाकरे गट) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. पदवीधर मतदारांच्या घरोघरी जावून जास्तीत जास्त नाव नोंदणी करण्याच्या सुचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली.
आगामी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे कोकण दौऱयावर आले आहेत. राजापूर कोंढेतड गाडगीळवाडी येथील प्रफुल्ल लांजेकर यांच्या निवास्थानी खळा बैठक घेत त्यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, विधानसभा संपर्क प्रमुख चंद्रपकाश नकाशे, राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भोवड, युवासेना उपजिल्हाधिकारी संतोष हातणकर, तालुका युवाधिकारी संदेश मिठारी, विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, प्रफुल्ल लांजेकर, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.ठाकरे पुढे म्हणाले की, मुंबई पदवीधर निवडणूक आपण सातत्याने जिंकत आलो आहोत. तशीच कोकण पदवीधर संघाची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. मागील निवडणुकीत आपली तयारी थोडीफार कमी पडली. मात्र यावेळी आजवर घेतलेला आढावा पाहता कोकणात शिवसेनेचा विजय निश्चित आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कोकणात शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आजपासूनच तयारीला लागा. तळागाळातील प्रत्येक पदवीधरापर्यंत पोहोचवून त्यांचे पश्न समजून घ्या आणि ते सोडविण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधी मार्फत प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी खासदार श्री.राऊत व आमदार श्री.साळवी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कोकण पदवीधर निवडणुकीकरीता जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.