(रत्नागिरी)
सुवर्णसूर्य फाउंडेशन व रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये नक्की सहभागी होऊ, असे सांगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याचे कारण आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये या स्पर्धेकरिता धावण्याचा सराव दर रविवारी आयोजित केला जात आहे. आज रविवारी सकाळी सुमारे १०० पेक्षा अधिक मुले, महिला, पुरुषांनी या प्रॅक्टिस रनमध्ये भाग घेतला. जणू काही स्पर्धेची रंगीत तालीमच आज घेण्यात आली.
रविवारी सकाळी वॉर्म अप झाल्यानंतर धावपटूंना बिब (रनिंग) नंबर देण्यात आले ते त्यांनी आपापल्या दर्शनी भागावर लावले. या सर्वांचे धावताना फोटोशूट करण्यात आले. थिबा पॅलेस, जेल रोड, मारुती मंदिर, जेल रोड, शासकीय विश्रामगृह थिबा पॅलेस या मार्गावर धावण्याचा सराव करण्यात आला. हॉटेल मथुरा येथे आणि मार्गावरही पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
आज फोटो शूट केल्यानंतर ऑप्टिकल कॅरॅक्टर रीड मेथडने आपला फोटो आणि बिब नंबर यांच्या होणाऱ्या टॅगिंगसाठी किती वेळ लागतो याची चाचणी घेण्यात आली. सर्व नावाजलेल्या मॅरेथॉनमध्ये अशा प्रकारे फोटोग्राफी केली जाते. यातून रत्नागिरीमध्ये स्पोर्ट्स फोटोग्राफी हेसुद्धा एक प्रोफेशन म्हणून फोटोग्राफर्सनी पाहावे, हा हेतू असल्याने स्थानिक फोटोग्राफर काम पाहत आहेत.
७ जानेवारी २०२४ रोजी हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. हाफ मॅरेथॉन २१ किमी तसेच १० किमी आणि ५ किमीसाठी स्पर्धा होणार आहे. ही मॅरेथॉन मारुती मंदिर नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, कोळंबे, फणसोप, भाट्ये अशा ९ गावातून निसर्गरम्य वातावरणात २१ किमीची मॅरेथॉन होणार आहे. ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. यामध्ये महिला, पुरुष यांचे वयोगटानुसार गट करण्यात आले आहे. यामध्ये आकर्षक बक्षिसे, चषक देऊन विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी यात भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेकरिता ॲथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे यांचे विषयी मार्गदर्शन, सहकार्य मिळत आहे. दरम्यान, कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या टीमने श्री. हनुमंत हेडे (उपसंचालक, पर्यटन संचालनालय, मुंबई), पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख (साखरपा) श्री. काकिर्डे, एम फिटनेसचे अमोल जाधव यांची भेट घेतली. त्यांनी सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. अमोल जाधव यांनी एम फिटनेस व्यवस्थापन टीम मॅरेथॉनच्या मार्गावर रनरचे स्ट्रेचिंग घेण्यासाठी व सर्व प्रकारच्या मदतीसाठी उपलब्ध असू, अशी ग्वाही दिली आहे.