(दापोली)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी ती लांबवणीवर पडण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे दापोली येथील कोकण कृषी विदयापीठाचे कुलगुरू कोण होणार याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहीली आहे.
सध्या कार्यरत असलेले कुलगुरु डॉ. संजय सावंत यांचा कार्यकाळ 28 मे 2023 रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या कुलगुरू पदासाठी काही दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून 3 एप्रिल 2023 पर्यंत उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेला शोध समितीकडे उपलब्ध झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. कुलगुरू पदासाठी इच्छुकांचे 30 पेक्षा अधिक अर्ज निवड समितीकडे आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या निवडीच्या तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्या तरी 28 मे नंतर लगेचच कोकण कृषी विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेला शोध समितीच्या अध्यक्षपदी कृषी अनुसंधान परिषदेचे निवृत्त महासंचालक डॉ. एस. अय्यप्पन तर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहसंचालक डॉ. पी. एन. साहू यांची समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. तसेच अन्य तीन कृषी शास्त्रज्ञांचा या समितीमध्ये समावेश आहे.
राज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेल्या कुलगुरू शोधन समितीकडून प्राप्त अर्जांपैकी छाननी करून वैध ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. त्यानंतर योग्य 5 उमेदवारांची निवड केली जाईल. या 5 नावांची शिफारस गोपनीय पद्धतीने बंद लिफाफा राज्यपालांकडे सुपूर्द केला जाईल. राज्यपाल सबंधित पाच जणांची मुलाखत घेऊन कुलगुरू पदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करतील. या सगळया प्रक्रीयेला अजून मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांपैकी एक असून कोकण विभागाच्या कृषी व संलग्न क्षेत्रांमध्ये अध्यापन, संशोधन आणि विस्तार शिक्षण यांच्या गरजा भागविण्यासाठी या विद्यापीठाची 18 मे 1972 रोजी स्थापना करण्यात आली. या कृषी विद्यापीठाच्या अधिपत्याखाली ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात.
महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम 1983 व त्यात शासनाच्या दिनांक 21 जुलै 2010 ते 13 ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या आदेशान्वये घोषित केलेल्या कुलगुरु पदासाठी विहीत केलेली अर्हता व अनुभव यांची पुर्तता या पदासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. यासाठी मार्च महिन्यात कुलगुरू शोधन समितीकडून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत या सगळयाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या सगळया संदर्भात शोधन समितीचे समन्वयक असलेले डॉक्टर पी. एन. साहू यांच्याजवळ संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ही छाननी प्रक्रिया सुरू असताना पदवी ग्राह्यतेबाबत आवश्यक असल्यास माहितीही मागवावी लागते, त्यामुळे छाननी प्रक्रियेला काही कालावधी जातो.