(लांजा)
दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कोकणातील स्थानिक व्यक्तिची कुलगुरुपदी नेमणूक करावी असे मत फणस शेतीत नावलौकिक मिळविलेले लांजातील युवा शेतकरी मिथिलेश देसाई यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत बोलताना मिथिलेश देसाई यांनी सांगितले की, महाराष्ट्रात शेतीला प्रगती पथावर नेण्यासाठी चार कृषी विद्यापीठ आहेत आणि त्यातील एक नावाजलेल विद्यापीठ म्हणजे बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ. कोकण कृषी विद्यापीठाने ह्यापूर्वी बराचकाळ आधी संशोधनं केली आहेत पण गेल्या काही वर्षात म्हणजे १२ ते १५ वर्षात कोकण कृषी विद्यापीठाबद्दल शेतकऱ्यांमध्ये विद्यापीठाबद्दल प्रचंड नाराजी तयार झाली आहे. कोकण कृषी विद्यापीठ हे कोकणातील शेती व फळबाग ह्यासाठी ५० वर्षांपूर्वी निर्माण केले आहे आणि सुरवातीच्या काळात विद्यापीठाने चांगली काम देखील केली आहेत.
कोंकण म्हटले की आंबा, काजू, फणस, नारळ, जांभूळ, कोकम, इत्यादी ह्या फळांची नाव समोर येतात. पण ह्या अलीकडच्या काळात विद्यापीठाने या फळांवर काहीच काम केले नाही. की ज्याने शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि आर्थिक उन्नती होईल.
काजू पीक हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील विषय आहे पण वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला ७ ह्या जाती खूप आधी निर्माण केल्या आहेत पण त्या नंतर काजू वर काहीच संशोधन किंवा काम विद्यापीठाने केलेलं नाही. विद्यापीठाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की काजू झाड म्हणजे वेंगुर्ला ४ किंवा ७, १५ ते १८ किलो काजू बी देतेत पण ही निव्वळ अतिशयोक्ती असून प्रत्यक्षात ६ ते जास्तीत जास्त ८ किलो काजू बी एक झाड देते. १५ ते १८ किलो एक झाड द्यायला लागले तर शेतकरी आर्थिक संपन्न झाला असता पण तसं झालं. म्हणून वारंवार मागणी होऊन देखील काजूची एखादी नवीन जात विद्यापीठाने विकसित केली नाही. काजू बी सोबत काजू बोंडांवर भक्कम अस काहीच काम केलेलं नाही, त्यावर मॉडर्न मार्केट मध्ये एखादं व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट तयार केलेलं नाही जेणेकरून शेतकरी त्याचा व्यवसाय करू शकतील. तिसरी गोष्ट म्हणजे ओले काजूगर सोलायच्या मशीनची मागणी १४ वर्षांपासून होती पण त्यावर पण संशोधन झालं नाही आणि शेवटी एका शेतकऱ्यानेच स्थानिक पातळीवर त्याची निर्मिती केली. चौथी गोष्ट म्हणजे काजू ला खोडकिड्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. त्यावर संशोधन करावं ही वारंवार विनंती करून देखील काही उपयोग झाला नाही.
कोकणातील दुसरं अतिमहत्वाचं पीक म्हणजे फळांचा राजा आंबा आणि आंबा जरी जग प्रसिद्ध असला तरी आंब्यावर नैसर्गिक हवामानामुळे इतक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर परिणाम हल्लीच्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला आहे आणि ते रोखण्यासाठी टास्क फोर्स सारख विद्यापीठाने काम करणं अपेक्षित होत पण ते देखील झालेलं नाही. हापूस आंब्याचं पूर्वी दरवर्षी उत्पन्न येत होतं पण आता ते दर दोन किंवा तीन वर्षांनी येत आणि ही खूप गंभीर बाब आहे.
तिसरं फळ म्हणजे फणस, जे जगाच्या मार्केट मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याची मागणी वाढली आहे. फणस हे असं एक फळ आहे ज्याला कोणत्याही खतांची गरज भासत नाही आणि शेतकरी फणस पिकामुळे आर्थिक संपन्न होऊ शकतो. इतक्या वर्षांमध्ये फणस ह्या पिकामध्ये फक्त एकाच (कोंकण प्रॉलिफिक) व्हरायटीच संशोधन केल आहे आणि त्यापासून होणाऱ्या पदार्थांवर देखील काम केलेले नाही.
चौथे फळ म्हणजे नारळ, केरळ कर्नाटक सारखाच कोंकण हा प्रदेश पण केरळ आणि कर्नाटक मध्ये लाखो हेक्टर वर नारळ लागवड झाली पण कोकणात नाही ह्याच एकच कारण म्हणजे त्याच्या वर आपल्या हवामानानुसार संशोधन झालं नाही आणि जे काही झालं आहे नारळ संशोधन केंद्र भाट्ये येथे, तिथे शेतकऱ्यांना वणवण फिरून बुकिंग करून सुद्धा पाहिजे तितकी नारळ झाड मिळत नाहीत. त्यामुळे नारळ लागवड कमी झाली आहे. कोकणापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात नारळ लागवड वाढत आहे ही आनंदाची बाब जरी असली तरी कोकणच मूळ फळ असून इकडे लागवड का झाली नाही ह्याच कारण विद्यापीठाने अद्याप सांगितलेलं नाही.
कोकम, करवंद, जांभूळ अशी अनेक फळ कोकणात नैसर्गिकरित्या होतात पण विद्यापीठाच्या नाकर्तेपणामुळे हे होऊ शकलं नाही. कोकण कृषी विद्यापीठाच्या गव्हरनिंग बॉडीवर राजकीय हस्तक्षेपामुळे आज देखील विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आहेत, ज्याच्या बदलाची मागणी गेल्या ५ वर्षांपासून होत आहे तरी देखील त्यामध्ये पण उदासीनता आहे.
त्यामुळे कोकण कृषी विद्यापिठाचे आगामी कुलगुरू स्थानिकच असावे व कोकणातील फळांबद्दल संपूर्ण माहिती असणारे हवे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू निवडताना कोणतेही राजकीय हस्तक्षेप होऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण कोणता ही राजकीय पक्ष स्वतःच्या जवळचा माणूस आणून बसवतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना हजारो शेतकऱ्यांच्यावतीने आम्ही अशी मागणी करत आहोत की, आगामी कुलगुरू स्थानिक कोकणातले व कोकणातील पिकांबद्दल माहिती असणाऱ्या योग्य व्यक्तीची निवड करावी असे त्यांनी स्पष्ट केले.