(ठाणे / उदय दणदणे)
कोकणची संस्कृती बरोबरच जनमानसात आपुलकीचं अतूट नातं जिव्हाळा, प्रेम सदभावना जपत उद्योजक तसेच कोकण कट्टा समुहाचे संचालक प्रमोद गांधी व संचालिका प्रियांका गांधी यांच्या वतीने गेली १६ वर्षे कोकणातील विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “कोकण रत्न” पुरस्काराने गौरविण्यात येते. उद्योजक-प्रमोद गांधी ,उद्योजिका- प्रियांका गांधी यांच्या वतीने रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व कोकण कट्टा द्वितीय वर्धापनदिनाचे औचित्य साधून “कोकण रत्न पुरस्कार-२०२३ सोहळा” कोकण कट्टा उपहारगृह अंधेरी (एम,आय, डी, सी, )मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मुंबईतील अंधेरी- एम. आय. डी. सी, येथील अस्सल चवीचा “कोकण कट्टा” हे कोकणातील खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय उपहारगृह असून कोकणातील खाद्यपदार्थ बरोबरच तेथील खाद्यसंस्कृती, कला साहित्य, सामान्यपर्यंत पोहचवण्याचा त्यांचा मानस असून कोकणाशी नाळ जोडलेल्या कला, उद्योग, समाजकार्य, शिक्षण, पत्रकारिता,अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व कोकणच्या जडणघडणीत बहुमुल्य योगदान देऊन कोकणचा बहुमान उंचावणाऱ्या व्यक्तींचा प्रतिवर्षी उद्योजक तसेच कोकण कट्टा समुहाचे संचालक प्रमोद गांधी संचालिका- प्रियांका गांधी यांच्याकडून “कोकण रत्न” पुरस्काराने गौरविण्यात येते.
२०२३ या वर्षीचा “कोकण रत्न पुरस्कार-२०२३” हा कलाक्षेत्रातील पुरस्कार कोकणातील जाखडी नृत्य (शक्ती तुरा) लोककलेत काव्य, गायन, शाहिरी माध्यमातून आपल्या नावाची अमीट मोहर उमटवणारे, रसिक प्रेक्षकांस अभिमान व नव्या पिढीला आदर्शवत असणारे लोककलाकर शाहीर-रामचंद्र हरी घाणेकर यांना (लोककला क्षेत्र) कोकण रत्न पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. तसेच पत्रकारिता क्षेत्रात कणखरपणे सत्याची बाजू दाखवत नि:ष्पक्षपातीपणा अंगिकरून राजकीय पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार- रश्मी पुराणीक यांना (पत्रकारिता क्षेत्र ) कोकण रत्न पुरस्कार २०२३ ने गौरविण्यात आले. त्याचबरोबर सिनेमा, नाट्य, मालिका, जाहिरात या कलाक्षेत्रात ’रबरस्टार’ हे नाव तंतोतंत लागू होते असे सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते विजय पाटकर यांना (अभिनय क्षेत्र ) “कोकण रत्न पुरस्कार-२०२३” ने सन्मानित करण्यात आले.
त्याच बरोबर दृष्टीहीन व्यक्तींना स्वतः विकसित केलेल्या ‘कलर थेरपी’ द्वारे रंगाची ओळख करुन देत त्यांचे आयुष्य उज्वल करणारे सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान देत कौतुकास्पद कार्यरत असणारे श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक- सुमित पाटील यांना (समाजकार्य क्षेत्र) कोकण रत्न पुरस्कार -२०२३ ने सन्मानित करण्यात आले. अशा विविध माध्यमातून कोकणचे नावलौकिक करणाऱ्या व्यक्तींना कोकण रत्न पुरस्कार -२०२३ ने सन्मानित करण्यात आले. सदर सोहळ्यात उपस्थित मान्यवर अभिनेते विजय पाटकर, शाहीर- रामचंद्र घाणेकर, पत्रकार-रश्मी पुराणीक तसेच कोकण कट्टा संचालक- प्रमोद गांधी, संचालिका- प्रियांका गांधी यांच्या शुभहस्ते मस्तकला क्रिएशन प्रस्तुत “राजे दैवत हो” या अल्बम व्हिडीओ गाण्याचे कलाकार पूजा अशोक मोईली, अमरजा गोडबोले, व नयन दळवी यांचे सत्कार करून राजे जय हो अल्बम पोस्टर लॉन्च करण्यात आले. तसेच कोकण कट्टा परिवारात जोडले गेलेल्या कर्मचारी तसेच विविध सेवा देणाऱ्या व्यक्तींचा आदरपूर्वक सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
सदर सोहळ्याप्रसंगी कोकण कट्टाच्या द्वितीय वर्धापनदिना निमित्त केक कापून आनंद साजरा करण्यात आला. कोकण कट्टा समुहाचे संचालक प्रमोद गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.