(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
शिक्षण संस्थाचालक संघाच्या, संगमेश्वर विभागाच्या वतीने माध्यमिक विद्यालयांच्या व कनिष्ठ महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंंदर्भात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर पाली येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती. या सभेत पालकमंत्री श्री.सामंत यांनी समस्या जाणुन घेत त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे वचन दिले. तसेच शिक्षण विभागातील कामे अधिकार्यांनी अडवु नका अशीही ताकीद यावेळी अधिकार्यांना दिली.
सदर मिटींगचे आयोयोजन रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाचे उपाध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी, समाज कल्याण खात्याचे अधिकारी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सदानंद भागवत तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संबंधित खात्याना योग्य त्या सूचना देखील दिल्या.
समाजकल्याण खात्यामार्फत दिल्या जाणार्या विविध शिष्यवृत्यांची रक्कम सन २०१८ पासून मिळालेली नाही. त्याबाबत राज्य शासनाचे त्या खात्याचे सचिव श्री. भांगे यांच्याशी फोनवर संपर्क करून परिस्थिती समजून घेतली. शिष्यवृत्ती मंजुरीची प्रक्रीया अंतिम टप्प्यात असून पुढील दिड ते २ महिन्यात शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल असे सांगण्यात आले. वेतनेतर अनुदान सन २००८ च्या पगारावर देण्यात येते. ते चालू वर्षाच्या वेतनाच्या आधारे ( ७वा वेतन आयोग) मिळावे यासाठी शिक्षण मंत्र्यांसमोर ही मागणी लावून धरू असेही आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री श्री.सामंत यांचे शिक्षण मंत्र्यांबरोबर फोनवर बोलणेही झाले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लेखी निवेदन देण्याची सूचना केली.
सन २०१२ पासून रिक्त झालेल्या पदांवर नवीन भरतीसाठी शासनाकडून मान्यता मिळत नाही. यास्तव काही एक किमान वेतन ठरवून अस्थायी स्वरुपात शिक्षक भरण्यास संस्थेस परवानगी द्यावी व त्यांचे किमान वेतन ( सिएचबी) शासनाकडून मिळावे. तसेच ज्या संस्थानी मागील काही वर्षांत तात्पुरत्या शिक्षक/ कर्मचाऱ्यावर पगारापोटी केलेला खर्च अशा संस्थाना परत मिळावा, तसेच नवीन शिपाई पदासाठी देऊ केलेले रुपये ५००० हे मानधन वाढवून मिळावे.अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या.
सदरच्या मागण्यासाठी शिक्षण मंत्र्यांसोबतच्या मिटींगमध्ये आपण यासाठी आग्रही भुमिका मांडू विशेषत: कोकणासाठी म्हणून आपल्याला काय वेगळी प्रोव्हीजन करता येईल, किमान वेतन, या निकषात कसे बसविता येईल याचा विचार करू असे आश्वासित केले. तसेच कोकणातील दुर्गम भागात हायस्कूलला जोडून चालवण्यात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयास अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे विशेष आग्रह धरू असा विश्वास दिला.
शाळेतील शिक्षक, कर्मचारी किंवा संस्था चालकांना शिक्षण खात्याकडून अडवणूक होता कामा नये किंवा त्यांना हेलपाटे घालायला लावू नयेत. अशा प्रकारे पारदर्शक काम करण्याची ताकीद पालकमंत्री तथा उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी संबंधित विभागांना दिली. मिटींगचे प्रास्ताविक व आभार रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचे उपाध्यक्ष श्री. अभिजित हेगशेट्ये यानी केले.