(मुंबई)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सलग पाच दिवस १० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती मानली जाणार आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णयामुळे प्रामुख्याने कोकणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
सततचा अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. राज्यात गेल्या महिन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे राज्य सरकारने अश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सलग पाच दिवस १० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास ती नैसर्गिक आपत्ती समजली जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय:
– नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता ‘परिस स्पर्श’ योजना
– अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता
– महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी.
– सेलर इन्स्टिट्यूट ‘सागर’ भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण
– देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल
– नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता. ४३.८० किमीचा मेट्रो मार्ग उभारणार
– ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद