(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्राच्या इतर भागाचा विकास हा सहकाराच्या माध्यमातून झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कोकणातील सर्वसमावेशक विकास होण्यासाठी सहकार समृद्ध होणे काळजी गरज आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार वाढीसाठी राजकारणविरहित एकत्र येऊन कार्य करण्याची गरज असून त्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सर्व चेअरमन, संचालक मंडळ आणि सचिव तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी तालुक्यातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने इंटेलेक्च्युअल पीपल्स फाउंडेशन दिल्ली यांच्यावतीने रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना सर्वोत्कृष्ट चेअरमन हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. सदर सत्कार सोहळा रत्नागिरी तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांनी आयोजन केले होते.
ते पुढे म्हणाले की, मला मिळालेला हा सन्मान माझा नसून, माझ्यासोबत काम करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत सर्व विकास संस्था व त्यासाठी कार्य करणाऱ्या चेअरमन, संचालक मंडळ आणि सचिव यांच्यासह बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा आहे. भविष्यात सर्वांनीच विकास संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच शासनाच्या विविध योजना व शासनाच्या विविध अनुदानाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी विकास संस्थेने एकत्रित मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.
यावेळी त्यांना आयोजकांच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र व भेटवस्तू देऊन सर्व विकास संस्था आणि अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विविध संस्थांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याच्या प्रस्तावनेत संचालक गजानन पाटील यांनी सत्कार सोहळ्याचा हेतू सांगताना चोरगे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण कार्याचा आढावा घेत त्यांना भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होऊन त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली. तर राजाभाऊ लिमये यांनीही तानाजीराव चोरगे यांच्या विविधांगी बाबींचा आढावा घेत शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे रवींद्र तथा अण्णा सामंत यांनी चोरगे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने केलेली प्रगती ही नक्कीच आशादायक असून त्यासाठी असेच कार्य करत राहावे अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी उपस्थित असणारे डॉ. सोपान शिंदे, मिलिंद कुलकर्णी, अनिल चव्हाण, प्रल्हाद शेट्ये, विनायक मोहिते, सचिन गिजबिले यांनीही आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. तर बँकेचे संचालक रामचंद्र गराटे यांनी आभार मानले.
याप्रसंगी मंचावर रत्नागिरीतील सुप्रसिद्ध उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत, सहकारी संस्था रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, नाबार्डचे रत्नागिरी जिल्हा प्रबंधक मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, यांच्यासह रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाटील, संचालक मधुकर टिळेकर, संचालक ऍड. दीपक पटवर्धन, संचालक रामचंद्र गराटे, कार्यकारी संचालक अनिल चव्हाण उपस्थित होते.
हा सत्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी बँकेचे क्षेत्रीय अधिकारी संदीप तांबेकर, कर्मचारी प्रतिनिधी जितेंद्र साळवी, नरेंद्र जाधव प्रदीप परीट, शेखर भावे इन्स्पेक्टर गंगावणे यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी, विकास संस्थेचे सर्व चेअरमन, पदाधिकारी आणि सचिव यांनी विशेष प्रयत्न केले.