(खेड / भरत निकम)
कोकणातील गोरगरीब मराठा समाजात गरजूंना ओबीसी आरक्षण दाखला मिळावा म्हणून, माजी आमदार संजय कदम यांनी सहकारी घेऊन खेड मधून आंदोलनाला पाठींबा देत एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. मात्र, कुणी आंदोलन स्थळी जावू नये. याकरिता कुणी तरी प्रयत्न केले. कोकणात मराठा आंदोलनात सहभाग घेवू नये म्हणून, कुणी तरी प्रयत्न केल्याने मराठा समाजात आजही सूर्याजी पिसाळ प्रवृत्तीच्या औलादी सक्रिय आहेत, अशी खरमरीत टीका मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते केशवराव भोसले यांनी केली आहे.
खेड शहरातील मराठा भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय कदम, संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर सुर्वे, सरचिटणीस यशवंत कदम, दीपक गुजर, नंदू साळवी, हेमंत साळोखे, संजय कडू, विश्वास शिंदे, रोहन विचारे, मनोज भोसले, मराठा पतसंस्थेचे शरद शिर्के, दीपक नलावडे, अंकुश विचारे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, कोकणामधील मराठा समाज हा लढवय्या असून, त्यातील ५ ते १० टक्के आर्थिक सुबत्ता असलेले आहेत. उर्वरित समाजातील नागरिक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करुन उदरनिर्वाह चालवत आहेत. अशा गरीब व गरजूंना आरक्षणाची खूप आवश्यकता आहे. एकीकडे नोकऱ्या उपलब्ध नाहीत, दुसरीकडे कोणत्याही सोयी सुविधा समाजाला मिळत नाहीत. अशा कैचीत समाज सापडलेला असून मराठा समाजाचे तरुण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा देवून गोरगरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु, कोणतेही प्रयत्न न करता उपोषणाला पाठबळ देण्याचे औदार्यही दाखवले नाही. याचे दुःख वाटतं आहे, अशी खंतही त्यांनी बोलताना व्यक्त केली.
कोकणातील मराठा समाज हा शुरवीरांचा असून लढवय्या आहे. राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटलेला असतानाही कोणत्या तरी शक्तीने हा मराठा समाज शांत केलेला होता, हेच कळतं नाही. ज्यांना ओबीसी दाखले नकोत त्यांनी, ते घेऊ नका, मात्र समाज आंदोलनाला पाठिंबा देणे गरजेचे असतांनाही अनेक नेते, पुढारी गप्प कसे बसले, त्यांना कुणी गप्प केले होते की काय, असे सवालही केशवराव भोसले यांनी उपस्थित केले आहेत.