(पाचल / तुषार पाचलकर)
राजा शिवाजी विद्यालय, विलवडे. प्रशालेमध्ये मुंबई सीमाशुल्क विभागातील अनुवाद अधिकारी, कोकणात शासकीय कर्मचाऱ्यांचे गांव निर्माण व्हावे यासाठी शैक्षणिक ज्ञानदान करणारे, कोकण भूमिपुत्र श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक व्याख्यानाचा लाभ पंचक्रोशीतील बहुसंख्य युवक – युवतींनी घेतला. तसेच या व्याख्यानाचा लाभ गोगटे- वाळके महाविद्यालय तसेच खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कुल बांदा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला.
आपले जीवन समृद्ध आणि गतिमान होण्यासाठी तरुणांना स्पर्धा परीक्षा तसेच व्यवसाय विषयी मार्गदर्शन होणे अत्यंत महत्वाचे आहे. ही काळाची गरज ओळखून संयोजक विलवडे गावचे शिक्षणप्रेमी श्री. संजय सावंत व गावचे सरपंच श्री. प्रकाश दळवी यांच्या माध्यमातून राजा शिवाजी विद्यालय, विलवडे प्रशालेमध्ये श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर यांचे १८१ वे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे. येथील युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी निर्माण होतील. स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने समोरे गेल्यास आपले गाव हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गांव होण्यास वेळ लागणार नाही. भविष्यातील शासकीय अधिकारी घडविण्यासाठी ही एक शैक्षणिक चळवळ आहे. विलवडे पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी, युवक- युवतींनी याचा लाभ घेऊन आपल्या जीवनात बदल करून यशस्वी व्हावे असे आवाहन श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर यांनी केले.
या व्याख्यानाला गावचे सरपंच श्री. प्रकाश दळवी, विलवडे (ता.सावंतवाडी) ग्रामोन्नती मंडळ, मुंबई. संस्थेचे माजी सरचिटणीस श्री. राजाराम दळवी, शिक्षणप्रेमी श्री. सुधीर सावंत, श्री. गोपाळ सावंत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बुद्धभूषण हेवाळकर, सहाय्यक शिक्षक श्री. सुहास बांदेकर , श्री. वनसिंग पाडवी उपस्थित होते.