(गणपतीपुळे / वैभव पवार)
समाजात सगळीकडे नकारात्मकता आणि अरसिकता वाढलेली असताना कोकणात मात्र संस्कृती आणि साहित्यप्रेम, निकोप साहित्यनिर्मिती प्रक्रिया अजूनही टिकून असल्याने या बाबी समाजाचे मन समृद्ध करणारे असून या वातावरणाचा सहवास लाभणे जे भाग्याचे असल्याचे मत जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये यांनी व्यक्त केले. ते कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालगुंड आणि कवी केशवसुत स्मारक मालगुंड, युवाशक्ती मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे मना-मनातील श्रावणसरी या उपक्रमाच्या प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार करताना साहित्याचा सहवास देणे काळाची गरज आहे. आजच्या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि इतर कवींचा सहभाग समृद्ध साहित्य चळवळीचे निदर्शक आहे. यावेळी उपक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये, जिल्हाध्यक्ष प्रा. आनंद शेलार, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रकाश साळवी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित असणारे कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रा. आनंद शेलार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना मालगुंड शाखेच्या वतीने आयोजित आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने साहित्य सर्वदूर नेण्यासाठी उपयोगी ठरणारा असल्याचे सांगितले.
यावेळी श्रावण आणि पाऊस हे विषय घेऊन स्वरचित काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मालगुंड व मालगुंड परिसरातील अनेक शाळांनी आपले विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला होता. तसेच यावेळी अनेक शिक्षक, पालक आणि साहित्यप्रेमी कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी ज्या – ज्या कवींनी आपल्या कविता सादर केल्या त्यांना – त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, नाट्य परिषदेचे अनिल दांडेकर, कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रकाश साळवी यांच्यासह रवींद्र मेहेंदळे, दत्तात्रय निमकर, सुधाकर शिर्के, विद्यार्थी, पालक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नलिनी खेर यांनी तर सूत्रसंचालन अरुण मोर्ये व अमेय धोपटकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोमसाप शाखा मालगुंडच्या कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, रामानंद लिमये, कोमसाप शाखा मालगुंडचे सचिव विलास राणे, स्मिता बापट, स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे यांच्यासह मालगुंड शाखेचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.