(राजापूर / तुषार पाचलकर)
कोकणातील महिलांना सुगरण म्हटलं जातं आणि या सुगरणीच्या हातून जे जेवण बनवलं जातं जे पदार्थ बनवले जातात त्याची चव मनाला भुरळ घालणारी असते, असे प्रोत्साहन रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती राजापूर अंतर्गत, भारतमाता प्रभाग संघ पाचल व ग्रामपंचायत पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहायता उत्पादित केलेल्या मालाचे प्रदर्शन व विक्रीच्या भव्य दिवाळी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बचत गटाच्या महिलांना दिले.
यावेळी आमदार राजन साळवी गटविकास अधिकारी विवेक गुंड, “उमेद” च्या तालुका अभियान व्यवस्थापक अर्चना भंडारी, तालुका व्यवस्थापक अमित जोशी, तालुका व्यवस्थापक अवधूत ताकवडे, पाचल ग्रामपंचायत बाबुलाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, भारत माता प्रभाग संघ पाचलच्या अध्यक्षा सौ विशाखा पाचलकर, सचिव समता मोरे यासह माजी बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, शिवसेनेचे प्रकाश कुवळेकर, तालुका प्रमुख कमलाकर कदम, पाचल विभाग प्रमुख गणेश तावडे, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हा उपक्रम 8 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान पाचल ग्रामपंचायत इमारतीच्या तळमजल्यावर राबविण्यात येत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दिवाळी फराळ, खाद्यपदार्थ,आकाश दिवे, विविध पणत्या,उठणे, साबण, कपड्यांचा सेल, रांगोळ्या, कॉस्मेटिक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.
आपलं मनोगतात विनायक राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील कोणत्याही भागात जा कोकणातील पदार्थ म्हटला किंवा कोकणातील भगिनींच्या हातचं जेवण म्हटलं तर त्याची चव वेगळी असते वैशिष्ट्य वेगळं असतं. दिल्लीच्या ठिकाणीही अशा प्रकारचं प्रदर्शन भरवलं जातं अशावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या महिला बचत गटांना दरवर्षी बोलावलं जातं त्यांना हे भाग्य मिळतं ते केवळ त्यांच्या कर्तुत्वामुळे आणि या कर्तुत्वाची ताकद आपल्या महिला बचत गटांच्या भगिनींमध्ये आहे फक्त त्यांना प्रोत्साहित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे. भारत माता प्रभाग संघ बचत गटांच्या महिलांना प्रोत्साहित करताना कोणताही पदार्थ मन लावून जीव ओतून बनवला तर त्याला चव येते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामपंचायत पाचल बाबत बोलताना त्यांनी सरपंच बाबालाल फरास सरपंच झाल्यानंतर उपसरपंच आत्माराम सुतार यांची त्यांना चांगली साथ लाभली ग्रामपंचायत च्या चौकटी बाहेर जाऊन असे विविध प्रकारचे उपक्रम राबविणे ही कौतुकाची बाब असल्याचे सांगून भारत माता प्रभाग संघ पाचल यांच्या बरोबर ग्रामपंचायत पाचलचे कौतुक केले.व उपस्थित बचत गटांच्या महिलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गेले कित्येक दिवस या महोत्सवाच्या तयारीत व्यस्त असणाऱ्या महिला भगिनी व्यासपीठावर मात्र कुठेच दिसल्या नाहीत, असा प्रश्न मात्र या प्रसंगी उपस्थित झाला.