(राजापूर)
“अमृत काळातील बजेट सादर करताना कोकणातील कष्टकरी लाभ घेऊ शकतील अशा अनेक योजना अर्थमंत्री श्रीम. निर्मलाताई सीतारमन यांनी लोकसभेत मांडल्या. त्याचे पडसाद कोकणात उमटवणे व त्यातून कष्टकर्यांना समृद्ध करणे ही जबाबदारी स्थानिक पातळीवर काम करणार्या कार्यकर्त्यांची आहे या जाणिवेतून वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची मंत्रालयात भेट घेऊन कोकणातील मत्स्यव्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.” अशी माहिती भाजपा महिला उद्योग आघाडीच्या अध्यक्षा व प्रथितयश महिला उद्योजिका सौ. उल्का विश्वासराव यांनी दिली.
कोकणातील रत्नागिरीचा किनारपट्टी भाग मत्स्य व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. मच्छिमार बांधव आजही हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने करताना दिसून येत आहेत. अशातच केंद्र सरकारची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आमच्या या बांधवांसाठी वरदान ठरेल. आपण याकामी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती सौ. विश्वासराव यांनी मंत्री मुनगंटीवार यांना केली.
यावर सुधीरभाऊंनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या खात्यामार्फत मत्स्य व्यवसाय सक्षम करण्यासाठी योजनेचा लाभ कसा घेता येईल याबाबत केलेले प्रेझेंटेशन उपस्थित मंडळींना दाखवले. व सर्वार्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना अभिप्रेत आहे अशा उंचीवर हा व्यवसाय नेण्यास तत्पर सहकार्य खात्यामार्फत केले जाईल असे आश्वासन दिले. सुधीरभाऊंनी माझ्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात, विशेषकरून राजापूरमध्ये माझ्या मत्स्यव्यवसायिक बांधवांनी आधुनिकतेची कास धरण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा यासाठी योजना प्रत्यक्षात येईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करत राहीन असे मत सौ. उल्का विश्वासराव यांनी व्यक्त केले.