रत्नागिरी : गोवा, केरळपेक्षा कोकण सुंदर आहे. त्यामुळे कोकण पर्यटनदृष्टया विकसित करताना येथील पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. त्याचबरोबर पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याची आवश्यकता असून, त्यासाठी सरकारने सागरी महामार्ग व ग्रीन फिल्ड महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून उभारण्यात येणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता पायाभूत सुविधा निर्माण करताना सागरी महामार्गाचे काम सुरू केले जाणार आहे. खाड्या जोडण्यासाठी आवश्यक ठिकाणी पुलाची कामे हाती घेतली जातील. याशिवाय ग्रीन फिल्ड रस्त्याचे कामही लवकर सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शहरातील रस्ते कामासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून दिली जाईल. परंतु, रस्त्याची कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे. कामाचा दर्जा पाहण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले पाहिजे. रास्त ठेकेदारांच्या भल्यासाठी नसून, जनतेच्या हितासाठी आहेत, हेही लक्षात घेण्याची आवश्यकता असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार डॉ. राजन साळवी, नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक गर्ग, जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक, उपनगराध्यक्ष रोशन फाळके, नगरसेवक राजन शेट्ये, शहरप्रमुख बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.