कोकणातील कलाकारांच्या कुंचल्यातून नेहमीच येथील सर्वांगसुंदर निसर्गाचे दर्शन होत असते . कोकणचे ग्रामीण जीवन, जुन्या वास्तू , नद्या – नाले जसे पर्यटकांना भुरळ घालतात तसेच ते कोकणातील चित्रकारांना देखील खुणावत असतात . निसर्गात रमणारा चित्रकार हा आपल्या रंग आणि कुंचल्याद्वारे निसर्गाच्या समीप पोहचण्याचा प्रयत्न करतो. निसर्ग आणि चित्रकार यांच्या अंतर्मनाचा जेंव्हा मिलाप होतो त्यावेळी चित्रपटलावर हुबेहूब दृष्ये साकारली जातात . निसर्गाची ही अनोखी दृष्ये पाहून रसिक अक्षरशः भारावून जातात . चित्राकृतीतून बोलणारा निसर्ग कलानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरकरांच्या भेटीसाठी सहा चित्रकारांच्या माध्यमातून १३ मे पासून येत आहे . यामध्ये खास वैशिष्ट्य आहे ते ९ वर्षीय बालकलाकार रेहा राजेशिर्के हिच्या कलाकृतींचे.
कोकणातील ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के हे कलाचळवळीतील मोठे नाव . नुकतेच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले . घरात दु:खद प्रसंग घडून देखील कलेसाठी धडपडणारे त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते . गेले काही दिवस त्यांच्या मनात कोकणातील काही कलाकारांच्या कलाकृतींचे कलानगरी असणाऱ्या कोल्हापूर मधील ‘ सराय ‘ गॅलरीत प्रदर्शन भरविण्याचे ठरत होते . राजेशिर्के यांनी स्वतः पुढाकार घेऊन सहा कलाकारांची निवड केली आणि कोल्हापूरची सराय गॅलरी भाड्याने घेऊन १३ मे ही प्रदर्शनाची तारीख देखील पक्की केली . १३ मे ते १८ मे असे सहा दिवस सुरु रहाणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन १३ मे रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे . या कला प्रदर्शनात खास आकर्षण असणार आहे ते ९ वर्षांच्या रेहा राजेशिर्के या बालकलाकाराच्या कलाकृतींचे . रेहा ही प्रकाश राजेशिर्के यांची नात असून बालपणापासून तिच्या अवतीभोवती चित्र आणि शिल्प पहायला मिळाल्यामुळे तिला कलेची ईश्वरी देणगी प्राप्त झाली आहे . रेहाची रेषा बोलकी असून त्यातून तिला काहीतरी वेगळे सांगायचे असते , याची जाणीव होते . बाल कलाकाराच्या अंतर्मनाचा वेध घेणाऱ्या रेहाच्या कलाकृती रसिकांना भुरळ घालतील , यात कोणतीही शंका नाही . आजोबा प्रकाश राजेशिर्के यांच्या अंगाखांद्यावर खेळताना त्यांच्याकडून नकळत कलेचे धडे घेणारी रेहा भविष्यात कलाक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल याची चुणूक तिच्या कलाकृतीतून मिळत आहे .
उर्वरीत कलाकारांमध्ये निसर्गा जवळ आपला कुंचला आणि रंगांच्या माध्यमातून नियमित संवाद साधणारे निसर्ग चित्रकार विष्णू परीट , प्रणय फराटे याबरोबरच प्रकाश महिनकर , संकेत कदम , दिगंबर मांडवकर यांच्या कलाकृतींचादेखील समावेश आहे . विष्णू परीट यांचे जलरंगावर कमालीचे प्रभुत्व आहे . आजवर त्यांची अनेक प्रदर्शने भरली असून विविध पुरस्कारांवर त्यांचे नांव कोरले गेले आहे . निसर्ग चित्रात हिरव्या रंगाच्या विविध छटांचा सहज वापर करण्यात परीट यांचा हातखंडा आहे . प्रवाही रंगलेपन आणि निसर्गाचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारी खास आणि वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती ही त्यांच्या चित्रांची खास वैशिष्ट्ये आहेत . निसर्गाचे हुबेहूब दर्शन घडविणाऱ्या परीट यांच्या चित्रांना रसिकांकडून सतत मोठी मागणी होत असते .
प्रणय फराटे हा युवा कलाकार सह्याद्री कलामहाविद्यालय सावर्डे येथे रंग आणि रेखाकलेचे शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असून त्याच्या बोटात , तर परमेश्वराने अक्षरशः जादूच भरली आहे . समोर दिसणारे निसर्गाचे दृष्य आपल्या रंग आणि कुंचल्याने आहे तसे नव्हे , तर त्यापेक्षाही सुंदर आणि लोभसवाणे करण्याची ताकद प्रणय मध्ये आहे . दररोज निसर्गासोबत बसून जलरंगचित्रणाचा कमालीचा सराव हे प्रणयच्या यशाचे गुपीत आहेत . प्रणय फराटेला आजवर अनेक निसर्गचित्रण स्पर्धेत पारीतोषिक प्राप्त झालेली आहेत . पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात सह्याद्री कला महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली होती . यावेळी प्रणय फराटेने साकारलेले कर्णेश्वर मंदिराचे चित्र आदित्य यांना भेट देण्यात आले होते . यावेळी प्रणयचा कलाविष्कार पाहून आदित्य ठाकरे यांनी देखील प्रणयच्या कलेचे कौतूक करुन त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली होती .
कोल्हापूरची ओळख कलानगरी अशीच आहे . अनेक नामवंत कलाकारांच्या पंढरीत कोकणातील सहा कलाकार आपला कलाविष्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखविणार आहेत याची कलारसिकांना मोठी उत्सुकता आहे . शिवशिल्प कॉलनी , विद्यापीठ मार्ग सम्राटनगर येथील ” सराय गॅलरी ” येथे १३ मे ते १८ मे दरम्यान सहा दिवस सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे चित्रप्रदर्शन रसिकांसाठी निशुल्क पहाता येणार आहे . रसिकांना ज्या कलाकृती आवडतील त्या खरेदी करण्याची संधी देखील मिळणार आहे . कोल्हापूर मधील कलारसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी केले आहे .
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !