रत्नागिरी : कोकणच्या भूमीला निसर्गाने भरभरुन दान दिलं आहे. कोकणातील कातळशिल्प हा गेली अनेक वर्षे संशोधनाचा विषय ठरत आहे. या कातळखोद चित्रांचा संशोधनानंतर पर्यटन वाढीसाठी उपयोग होणार आहे. यातूनच कोकणातील कातळशिल्पांचा समावेश आता मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. पुरातत्व शास्त्र अभ्यासक्रमात करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठ पुरातत्व विभाग आणि निसर्गयात्री संस्था यावर एकत्रित काम करणार असल्याची माहिती पुरातत्व शास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका प्रा. डॉ. प्राची मोघे यांनी दिली.
या कातळशोध शिल्पांचा पुरातत्वशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास दौरा सुरु केला आहे. या अभ्यासदौर्यात संगमेश्वर येथील कसबा व मंदिरे तसेच उक्षी, चवे-देऊ ड (रत्नागिरी), कशेळी, रुंढेतळी, देवाचे गोठणे, बारसू (राजापूर), कुडोपी (सिंधुदुर्ग) इत्यादी कातळशिल्पांची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर देवगड वाडयातील लेणी आणि कोळोशी येथील अश्मयुगीन गुहा, गावखडी (रत्नागिरी) येथील समुद्री कासव संरक्षण संवर्धन केंद्राला या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.
या अभ्यास दौर्या दरम्यान कातळशिल्प सर्वेक्षण, डॉक्युमेंटेशन, कातळशिल्पांचे प्रयोजन, वैशिष्टय, शास्त्रीय विवेचन यांची मुद्देसूद माहिती निसर्गयात्रीचे अध्यक्ष सुधीर रिसबुड, ॠत्विज आपटे यांनी समजावून सांगितली. कातळशिल्प साईट सूची, एकमेकांशी असलेले साहचर्य, लँडस्केप, आदिम प्रतीकवाद, मेसोलिथिक आणि निओलिथिक संबंधा अशा अनेक मुद्यांची माहिती त्यांनी दिली.
आमच्यासाठी निश्चितच गौरवाची, आनंदाची बाब
गेली अनेक वर्षे निसर्गयात्री संस्था, सदस्यांच्या शोध कार्यातून पुढे आलेल्या कोकणातील कातळशिल्प रचनांचा समावेश आता एम. ए. पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासक्रमात करण्यात आल्याने आमच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे असे निसर्गयात्री संस्थेचे अध्यक्ष रिसबुड यांनी सांगितले.