मूळचे दापोली तालुक्यातील मुरूड येथील असलेले कोकणातील आंबा शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांचे गुरुवारी २२ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे उपचार सुरु असताना अल्पशा आजाराने निधन झाले, ते ६० वर्षांचे होते.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा च्या वनशास्त्र महाविद्यालयाचे असोशिएट डीन होते. अलीकडेच त्यांनी कृषी विद्यापीठातुन सेवानिवृत्ती घेतली होती. कृषी विद्यापीठात ते विद्यार्थी, प्राध्यापक आदी सगळ्यांमध्ये लोकप्रिय होते. जन्म दि. १३ ऑगस्ट १९६० रोजी झाला असुन सातवीपर्यतचे शिक्षण त्यांचे मुळगावी म्हणजेच दापोली तालुक्यातील मुरूड गावी प्राथमिक उर्दू शाळेत, त्यापुढील दहावी पर्यतचे शिक्षण दापोलीच्या नॅशनल उर्दू शाळेत तर १२वी पर्यतचे शिक्षण खेड तालुक्याच्या फुरूस येथील कनिष्ठ महाविद्यालयात झाले. त्यांनी कोकण कृषि विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह व एम.एस्सी. (कृषी) ही पदव्युत्तर पदवी वनस्पती शरीरक्रियाशास्त्र विषयात पूर्ण केली. त्यानंतर आचार्य पदवी त्यांनी कर्नाटक राज्यातील कृषी विद्यापीठ, धारवाड येथून सुवर्ण पदकासह प्राप्त करून कोकणची शान वाढवली. डॉ. मुराद बुरोंडकर यांना ३० वर्षांपेक्षा अधिक आंबा पीक उत्पादन आणि काढणी पश्चात शरीरक्रियाशास्त्र व १५ वर्षांचा भात शरीरक्रिया शास्त्रामध्ये संशोधनाचा दांडगा अनुभव होता. आंबा उत्पादन तंत्रज्ञानाशी संबंधीत नऊ शिफारसी व तीन संकरित जातींच्या निर्मितीमध्ये संशोधक म्हणून त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे. आंब्याच्या एक वर्षाआड फळधारणेवर उपाय म्हणून भारतात पहिल्यांदाच सन १९८६ ते सन १९९२ या दरम्यान पॅक्लोब्युटॉझॉलच्या उपयोगासंबधीचे संशोधन त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी ठरले. त्यामुळे हापूस सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असलेल्या झाडाला दरवर्षी लवकर मोहर येऊन आंब्याचे उत्पादन २ ते २.५ पटीने वाढले आहे. मागील २० वर्षापासून कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील आंबा उत्पादक दरवर्षी २० हजार लिटरपेक्षा जास्त पॅक्लोब्युट्रॉझॉलचा उपयोग जवळपास ७ ते १० हजार हेक्टर क्षेत्रासाठी करतात.त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक, कृषी आदी सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यात त्यांचे मोठे योगदान होते.