विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी दौरा करून, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली. ते म्हणाले की, विरोधकांचा दौरा हा सूट-बूट दौरा आहे. शिवाय, फडणवीस व दरेकरांनी या दौऱ्यात वापरलेल्या बुटांबद्दलही टिप्प्णी केली होती. यावर आता प्रविण दरेकरांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
दरेकर म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांच्या बुटांकडे लक्ष देण्यापेक्षा नुकसानग्रस्त कोकणवासीयांना मदत करा!, अन्यथा, पुमा, नायकी बाजूला राहिलं, कोकणवासीय ‘कोल्हापुरी चप्पल’ हातात घेऊन नवाब भाईंचं स्वागत करतील..! त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते तीन दिवस, मुख्यमंत्री तीन तास. विरोधी पक्षनेते कोकणवासीयांच्या बांधावर जाऊन विचारपूस तर मुख्यमंत्र्यांचा केवळ दर्शनाचा कार्यक्रम. अशाप्रकारचे ट्विट दरेकरांनी केलेले आहे.
या दौऱ्यात दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांचे एकसारखेच बूट होते. आता दौऱ्यासाठी ते बूट खरेदी करत आहेत, मग ते दौऱ्यावर जात आहेत. त्यांना (मुख्यमंत्र्यांच्या) दौऱ्यावर प्रश्न निर्माण करण्याचा अधिकार नाही. बूट एकसारखे घालत आहेत, म्हणजे दौऱ्यासाठी तयारी करत असताना बूट खरेदी करत आहेत. म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये जाण्यासाठी बूट नवीन खरेदी करावे लागत आहेत. कारण, आपण फोटो पाहिला तर दोन्ही विरोधी पक्षनेते हे एकसारखेच नवीन बूट घालून ते दौऱ्यावर होते, हे सगळ्या फोटोंमधून दिसून येते असे नवाब मलिक म्हणाले होते.
Post Views: 49