(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मोकाट जनावरांमुळे रत्नागिरीकरांचे रस्त्यावर वावरणे कठीण झाले असताना आता कुत्र्यांची दहशत सुरू झाली आहे. दिवसा रस्त्याच्या मधोमध गुरे बसून असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, तर रात्री रस्त्यावर कुत्री गटागटाने बसलेली असतात. शहरातील एक रस्ता, गल्ली किंवा चौक असा नाही की तिथे मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त नाही़ आज शहराच्या विविध भागात असे कुत्रे मोकाट फिरत असून, काही ठिकाणी तर या कुत्र्यांच्या टोळक्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे़.
कोकण नगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा अक्षशः सुळसुळाट झाला आहे. हे मोकाट कुत्रे घोळक्याने फिरत असल्याने अबाल वृध्द व लहान मुलांमध्ये भीती निर्माण होत आहे. शिवाय, पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला, जेष्ठ नागरिकांना देखील या कुत्र्यांची भीती वाटत असते. त्यामुळे घराबाहेर पडतांना या कुत्र्यांची दहशत जाणवते. शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस विलक्षण भर पडत असून या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अबाल वृद्ध आणि लहान मुलांना तर एकटे घराबाहेर पाठवणे धोकादायक वाटू लागले आहे. रात्रीच्या काळोखात रस्त्यावर फिरणारे कुत्रे हे तर काही ठराविक रस्त्यावर नेहमीचेच चित्र झाले आहे, त्यामुळे शहरात पुन्हा कुत्र्यांचे निर्बिजीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी कोकणनगरच्या नागरिकांकडून होत आहे.
ठोस उपाययोजना राबवा
काही वर्षापूर्वी रत्नागिरी नगर परिषदेने ठोस भूमिका घेऊन शहरातील सर्व कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया केली होती. मात्र जनावरांच्या त्रासाला कंटाळलेले नागरिक आता मोकाट कुत्र्यांना त्रासले आहेत. कुत्र्यांच्या टोळ्या स्वाभाविपणे नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. या मोकाट कुत्र्यांबाबत ठोस भूमिका राबवावी अशी मागणी कोकण नगर परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.