रत्नागिरी : इंग्लडची बाजारपेठ काही वर्षांपुर्वी हापूससाठी खुली झाली. तेथील तळागाळातील नागरिकांपर्यंत हापूसची महती पोहोचवण्याच्या उद्देशाने आयातदार तेजस भोसलेंनी पावले उचलली आहेत. हापूसच्या झाड कसे असते, यापासून ते फळ काढेपर्यंतची माहिती यासह कर्नाटक आणि हापूसमधील फरक याचा व्हिडीओ इंग्लडवासीयांपर्यंत पोचवला जाणार आहे. त्यासाठी मेंगलोरमधील एजन्सीकडून रत्नागिरीतील प्रमुख बागायतदारांच्या मुलाखती, बागेतील चित्रीकरण करण्यात आले आहे.
🟧 हापूसची चव सातासमुद्रापार पोहोचली असून दरवर्षी हजारो मेट्रीक टनाची निर्यात केली जाते. सर्वाधिक हापूस आखाती देशांमध्ये पाठविला जातो. त्यापाठोपाठ अन्य देशांचा क्रमांक लागतो. इंग्लडवासीयांमध्ये हापूसला प्रचंड मागणी आहे. हापूसची चव, रंग यासह हे फळ लागणारी झाडे, बागांची माहिती यासह बागायतदारांना करावे लागणार कष्ट लोकांपर्यंत पोचवण्यासाठी इंग्लडमधील आयातदार श्री. भोसले यांनी एजन्सीमार्फत चित्रीकरण केले आहे. 23 फेब्रुवारीला एजन्सीचे प्रतिनिधी व्हीटस लासर्डो यांनी रत्नागिरीतील प्रमुख हापूस निर्यातदारांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करुन मुलाखती घेतल्या. आंबा बागांचे चित्रीकरण केले. यामध्ये अमर देसाई, डॉ. विवेक भिडे, सचिन लांजेकर, गौरव सुर्वे या बागायतदारांचा समावेश आहे. हापूसची चव इंग्लंडवासीयांना भुरळ पाडत असली तरीही त्याची माहिती जाणून घेण्यासाठी अनेक नागरिक उत्सुक आहेत. झाडांवर आलेला मोहोर, त्यावर होणारे औषधांची फवारणी, फळधारणेसाठी करावे लागणारे प्रयत्न, आंबा काढणी, निर्यातीसाठीची आंबा भरताना घेण्यात येणारी काळजी, वाहतूकीसाठी वापरले जाणारी यंत्रणा, रायपनिंग, आंब्यातील साका ओळखण्यासाठीची यंत्रणा, दर्जेदार फळ निवडण्याची प्रक्रिया याचे सविस्तर चित्रिकरण व्हायटस् यांनी केले. डोंगरांमध्ये पसरलेल्या विस्तीर्ण बागांच्या चित्रीकरणासाठी ड्रोणची मदत घेण्यात आली. हे व्हीडीओ इंग्लडमधील आयातदार तेजस यांच्याकडे पाठवण्यात येतील. त्यांच्यामार्फत पुढे लोकांना दाखवले जाणार आहेत.