(सिंधुदूर्ग)
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भराडीदेवी यात्रेसाठी आले होते. यावेळी कोकण विभागाच्या विकासासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं मोठी घोषणा केली आहे. कोकणाच्या विकासासाठी नियोजन प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याशिवाय मुंबईसह कोकणातील किनारपट्टीवरील जलवाहतूक विकसित करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेतील कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री आणि सिंधुदूर्ग पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांची गाडी चालवत यात्रेत सहभाग घेतला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोकण किनारपट्टीला मुंबईशी जोडण्यासाठी सरकार जलवाहतूक विकसित करणार आहे. याशिवाय कोकणातील जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी कोकण नियोजन प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे. त्यामुळं आता कोकणाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केल्यामुळं अनेक योजना कोकणात सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री शिंदें – केंद्रीय मंत्री राणे एक तास चर्चा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भराडीदेवीच्या यात्रेच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मालवणमधील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.