(चिपळूण)
कोकणकन्या एक्स्प्रेसमधून प्रवास करताना एका महिलेच्या पर्समधील ६५ हजारांचे दागिने चोरट्याने चोरल्याची घटना ८ जूनला पहाटे सव्वा तीनच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात सोमवारी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मानसी मीनेश पाटील (वय ३५, रा. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मानसी पाटील या कोकणकन्या एक्स्प्रेसमधील जनरल डब्यातून छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कणकवली असा प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्या बसलेल्या आसनाच्या पायाजवळ ठेवलेल्या राखाडी रंगाच्या सॅकमध्ये छोटी पर्स होती. त्यामध्ये असलेल्या स्टिलच्या डब्यात मंगळसूत्र, कर्णफुले, अंगठी असा ६५ हजारांचा ऐवज ठेवला होता. चोरट्याने ती सॅक चोरली. हा प्रकार पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.