( मुंबई )
दहावी आणि बारावीच्या लवकरच परीक्षा सुरू होणार आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, यासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार असून, परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश देण्यात येणार नाही. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. कलम १४४ म्हणजेच जमावबंदीच्या अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात येतील. तसेच परीक्षा केंद्रांच्या ५० मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉपीमुक्त अभियानावर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यावर विस्तृत सादरीकरण केले. श्रीकर परदेशी हे जेव्हा नांदेडचे जिल्हाधिकारी होते, तेव्हा त्यांनी नांदेड जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविले होते. त्याचा भरपूर फायदा झाला होता. या अभियानात राज्याचा ‘नोडल अधिकारी’ म्हणून शिक्षण आयुक्त यांना व प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच ‘समन्वयक अधिकारी’ म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात यावी. संवेदनशील समजल्या जाणा-या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
झेरॉक्स सेंटरवर बंदी
परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्तावरही भर देण्यात येणार आहे. ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश देण्यात येणार नाही. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येईल. कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात येतील. केंद्रांच्या ५० मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे ठरविण्यात आले आहे.