(नवी दिल्ली)
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रोज नवनवीन घडामोड समोर येत आहे. आता वरिष्ठ नेते दिग्विजयसिंह यांचे नाव आश्चर्यकारकरित्या पुढे आले असून आज ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी चर्चा वर्तुळात आहे. राजस्थानातील नाट्यामुळे उमेदवारी अडचणीत आलेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत गुरुवारी अध्यक्षा सोनिया गांधींना भेटणार आहेत. शशी थरूर उमेदवारी अर्ज उद्या शुक्रवारी (ता. ३०) भरणार आहेत. मात्र, गांधी कुटुंबाचा उमेदवार कोण असेल, यावर अजून संभ्रमावस्था कायम आहे.
आतापर्यंत मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे गांधी कुटुंबाचा पसंतीचा उमेदवार असतील, असे मानले जात होते. मात्र, राजस्थानमधील सत्ता नाट्यानंतर पक्षश्रेष्ठी गहलोत यांच्यावर नाराज आहेत. दरम्यान, खर्गे यांचेही नाव चर्चेत आले आहे. राजस्थानातील वादग्रस्त घडामोडींनंतर त्यांचे नाव मागे पडून कमलनाथ, दिग्विजयसिंह, मुकूल वासनिक, कुमारी शैलजा, के. सी. वेणुगोपाल यासारख्या अन्य नावांवर अटकळबाजी सुरू आहे.
कमनलनाथ यांनी मध्यप्रदेशात लक्ष देणार असल्याचे व अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. तर पक्षातील सर्वोच्च पदासाठी दिग्विजयसिंह यांचे नाव सोनिया गांधींनी सुचविले असल्याचेही कमलनाथ यांनी म्हटले आहे. त्यानंतर दिग्विजयसिंह यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे. आज ते अर्ज दाखल करणार असल्याचेही सांगितले जाते. परंतु दिग्विजयसिंह यांची क्षमता, स्वतंत्र बुद्धी तसेच स्वत:ची समांतर संपर्क यंत्रणा पाहता गांधी कुटुंब त्यांच्यावर विसंबून राहण्याच्या मनस्थितीत आहे काय, असा सवाल कॉंग्रेसच्या नेत्यांनीच उपस्थित केला आहे.
या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि शिस्तभंग कारवाई समितीचे अध्यक्ष ए. के. अॅन्टनी दिल्लीत पोहोचले असून त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. याबाबत सचिन पायलट यांची प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासमवेत बैठक झाली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज सोनिया गांधींना भेटणार असल्याचे सांगितले जाते. या भेटीगाठीच्या पार्श्वभूमीवर, दिग्विजयसिंह यांनी अर्ज भरला तरी अध्यक्षपदाच्या अंतिम लढतीत गांधी कुटुंबाचा उमेदवार कोण असेल, याचे उत्तर सोनिया-गेहलोत भेटीनंतरच स्पष्ट होईल असे मानले जात आहे.