(देवरुख / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव साखरपा येथील थोर समाजसेवक कै. नानासाहेब शेट्ये स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी व्यक्ती व संस्था पुरस्कार दिला जातो. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना स्वतंत्रपणे हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी संस्था पुरस्कार हर्चे ता . लांजा येथील श्री सत्येश्वर शिक्षण प्रसारक संस्थेला तर व्यक्ती पुरस्कार लोवले संगमेश्वर येथील जे. डी. पराडकर यांना जाहीर झाला आहे .
यावर्षी कै. नानासाहेब शेट्ये यांचा तिसावा स्मृतीदिन असून १ ऑगष्ट २०२३ रोजी या पुरस्कारांचे वितरण नानासाहेब शेट्ये सभागृह साखरपा येथे सकाळी ११ वा . संपन्न होणार आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे ग्रामीण अध्यक्ष दत्ताराम शिंदे , प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विष्णू रामाणे तसेच महात्मा गांधी विद्यालय साखरपाचे प्राचार्य श्रीधर लांडगे आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत . याच कार्यक्रमात पुरस्कार वितरणासोबत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच दहावी बारावी मध्ये तीनही शाखात प्रथम आलेल्या पंचकोशीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे .
संस्था पुरस्कार प्राप्त श्री सत्येश्वर शिक्षण प्रसारक संस्था लांजा तालुक्यातील हर्चे येथे बॅ . नाथ पै विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय चालवून ग्रामीण भागात अनेक अडचणींवर मात करत गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत आहे . निकालाची उत्तम परंपरा आणि गुणवंत विद्यार्थी घडविणारी शाळा म्हणून सत्येश्वर संस्थेचा नावलौकिक आहे . तर जे . डी . पराडकर यांनी उत्कृष्ट पर्यावरण , पर्यटन , ऐतिहासिक स्थळे याबाबतची केलेली पत्रकारिता , सातत्यपूर्ण लेखन , पाच पुस्तकांचे प्रकाशन याबरोबरच कलाक्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य आणि पैसा फंड इंग्लिश स्कूल येथे स्वतंत्र कलावर्ग आणि कलादालनाची निर्मिती करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठी संधी उपलब्ध करुन दिली असल्याने त्यांना यावर्षीचा व्यक्ती पुरस्कार जाहिर झाला आहे .
साखरपा येथे १ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या कै . नानासाहेब शेट्ये ३० वा स्मृतीदिन , पुरस्कार वितरण आणि विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्मारक समिती अध्यक्ष संदेश उर्फ बापूसाहेब शेट्ये , सरचिटणीस संतोष केसरकर ग्रामीण समिती अध्यक्ष दत्ताराम शिंदे , चिटणीस रमाकांत शिंदे खजिनदार मारुती शिंदे , कार्याध्यक्ष गणपत शिर्के , रमाकांत शेट्ये , मिलींद भिंगार्डे , मनोहर पोतदार , विरेंद्र शेट्ये , सुहास कदम , अब्दुल हमीद खतीब , दीपक शेट्ये , प्रसाद कोलते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.