(कोलकाता)
रिंकु सिंह आणि आंद्रे रसेलने वादळी खेळी करत केकेआरला पंजाबविरोधात विजय मिळवून दिला आहे. रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत केकेआरला थरारत विजय मिळवून दिला. त्यापूर्वी आंद्रे रसेलने ४२ धावांची धडाकेबाज खेळी साकारत संघाला विजयासमीप पोहोचवले. पण १९.५ व्या चेंडूवर तो धावचीत झाला आणि त्यानंतर अखेरच्या चेंडूवर रिंकूने चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्सने केकेआरपुढे १८० धावांचे आव्हान ठेवले होते.
पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करायला केकेआरचा संघ मैदानात उतरला खरा, पण त्यांची सुरुवात आश्वासक झाली नाही. कारण पाचव्या षटकात केकेआरचा गुरबाझ १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर काही काळ जेसन रॉय आणि कर्णधार नितिश राणा यांची दमदार भागीदारी झाली. पण रॉय ३८ धावांवर बाद झाला आणि केकेआरला दुसरा धक्का बसला. त्यानंतर फलंदाजीला आलेला वेंकटेश अय्यर ११ धावांवर बाद झाला.
केकेआरचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते, पण तरीही राणा हा खेळपट्टीवर टिकाव धरून होता. राणाने यावेळी अर्धशतक झळकावले. त्यानंतर आंद्रे रसेल यानेही जोरदार फटकेबाजी करीत विजयासमिप आणले आणि २ बॉलमध्ये २ धावांची गरज असताना अखेरच्या षटकातील ५ व्या चेंडूवर एक धाव घेताना रसेल धावबाद झाला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना रिंकू सिंगने चौकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या बळावर पंजाबने निर्धारित २० षटकात ७ विकेटच्या मोबदल्यात १७९ धावांपर्यंत मजल मारली होती. शिखर धवन याच्याशिवाय शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांनी अखेरीस दमदार फलंदाजी केली. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. प्रभसिमरन अवघ्या १२ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर भानुका राजपक्षे यानेही विकेट फेकली. हर्षितने राजपक्षे याला भोपळाही फोडू दिला नाही.
एका बाजूला विकेट पडत असताना शिखर धवन याने संयमी फलंदाजी केली. धवन याने पंजाबच्या डावाला आकार दिला. शिखर धवन याने ४७ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. लियाम लिव्हिंगस्टोन १५ आणि जितेश शर्मा २१ यांना चांगली सुरुवात मिळाली. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. वरुण चक्रवर्तीच्या जाळ््यात हे दोन्ही फलंदाज अडकले. त्यानंतर सॅम करन याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. युवा सुयेश शर्मा याने सॅम करन याला चार धावांत तंबूत पाठवले.