रत्नागिरी : रत्नागिरी युवा पिढीच्या कर्तुत्वाला चालना देणारे आणि रत्नागिरीच्या औद्योगिकीकरणाचा मार्ग प्रशस्त करणारे भरीव काम नामदार नारायणराव राणे यांच्या मंत्रीपदामुळे शक्य होणार असल्याचे मत द. रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आज येथे व्यक्त केले.
कोकणचे नेते नारायण राणे यांनी काल नवी दिल्ली येथे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात जल्लोष करण्यात आला. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्येही भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज सकाळी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्या वेळी अॅड. पटवर्धन बोलत होते.
राणे साहेब म्हणजे दरारा!
ते म्हणाले, कोकणच्या मातीमधून अथक प्रयत्न करत आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, मंत्री, खासदार आणि आता केंद्रीय कॅबिनेट मंत्री असा यशस्वी प्रवास करताना लोकमानसात आपला जनाधार सातत्याने वाढवत नेणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय राणेसाहेब. राणे साहेब म्हणजे दरारा, राणे साहेब म्हणजे आक्रमकता, राणे साहेब म्हणजे कर्तव्यदक्ष, राणे साहेब म्हणजे कार्यकर्त्यांचा तारणहार, राणे साहेब म्हणजे कोकणचा विकास पुरुष अशी अगणित बिरुदावली राणे साहेबांना चपखल बसतात. राजकारणातले कधीही शांत न होणारे वादळ असलेली व्यक्ती चाणाक्ष लोकप्रिय नरेंद्रजी मोदी यांनी हेरली आणि काल नामदार नारायणराव राणे हे केंद्रीय मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री झाले.
भाजपला नवसंजीवनी
अनेक वर्षांनंतर केंद्रात महत्त्वाचे सत्ता पद प्राप्त झाले आणि त्यामुळे संपूर्ण कोकणात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. आनंदाला पारावार राहिला नाही. भाजपा संघटनेला नवसंजीवनी प्राप्त होणार आहे हे आता निश्चित झाले. नामदार नारायण राणे यांना सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय हे महत्त्वपूर्ण मंत्रालय देण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पना राबविण्याचा निर्णय, लघू व मध्यम उद्योगांना चालना देण्याचे धोरण या पार्श्वभूमीवर सूक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्रालय नामदार नारायण राणे साहेबांना प्राप्त झालं हे भारतातल्या युवा पिढीसाठी खूप महत्त्वाचे आहे.
युवा पिढीसाठी केंद्र शासनाच्या उद्योग प्रधान योजना नेटक्या राबवण्याचे कसब आणि धडाडी नामदार राणेसाहेब आपल्या पूर्वअनुभवी व्यक्तिमत्वाच्या जोरावर निभावतील, हा विश्वास बाळगण्यामध्ये कोणतीही अतिशय अतिशयोक्ती होणार नाही.
कार्यभार स्वीकारतानाच लघू मध्यम उद्योगांचे जीडीपीमध्ये योगदानाचा बेसिक मुद्दा, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत किती प्रमाणात लघू, मध्यम उद्योग उभे राहिले, असे महत्वाचे प्रश्न उपस्थित करताना अधिकारी वर्गाला योग्य संदेश नामदार राणेसाहेबांनी दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
औद्योगिकीकरणास पाठिंबा
रत्नागिरी जिल्हा हा औद्योगिक विकासात मागे पडला. राजकीय नेतृत्वाने न दाखविलेली दूरदृष्टी सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी राहिले लोकमत, कोकण विकासामध्ये अडसर ठरलं. येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात शिवसेनेला यश आले नाही. कोणताही उद्योग येणार म्हटलं की विरोधाचा सूर लावून आपली पोळी भाजून घेण्याकडे असलेला कल, औद्योगिकीकरणात जिल्ह्याला अत्यंत खालच्या स्थानी घेऊन गेला. औद्योगिकीकरण नसल्याने येथे युवकांच्या हाताला काम नाही, उच्चशिक्षित होऊनही रोजगाराची संधी नाही, शेती परवडत नाही मत्स्यव्यवसाय लहरी निसर्गावर व नवीन यांत्रिक नौकांच्या अतिक्रमणाने भरडला गेलेला उद्योग ठरला आहे. अशा विपन्नावस्थेत रत्नागिरी असताना नामदार नारायण राणे यांना सूक्ष्म लघू व मध्यम उद्योग खाते प्राप्त झाले, हे रत्नागिरीतील युवकांसाठी खूप सकारात्मक ठरणार आहे.
युवक, युवतींना, बचत गटांना संधी
रत्नागिरीतील एमआयडीसी पाहिली तर बहुतांशी बंद पडलेली युनिट, नव्याने येऊ घातलेल्या एमआयडीसीला राजकीय मतलबातून होत असलेला विरोध यामुळे सर्वत्र नैराश्याचे वातावरण आहे, युवकांमध्ये असंतोष व नैराश्य आहे. अशा विपरीत परिस्थितीत नारायणराव राणे यांना सूक्ष्म लघू व मध्यम उद्योग मंत्रालय प्राप्त होणे हे उषःकालाचा अनुभव देणारे ठरेल. रत्नागिरीच्या औद्योगिक वसाहतीचा उपयोग खर्या अर्थाने उद्योगांसाठी व्हावा, सूक्ष्म उद्योग लघू व मध्यम उद्योगांना चालना मिळेल, योग्य सुविधा प्राप्त होतील, त्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांचा थेट लाभ उद्योजकांना मिळेल, याकरिता नारायणराव राणे नक्की आग्रही राहतील. निर्णय घेतील, सूक्ष्म उद्योगांचे जाळे निर्माण करत येथील महिलावर्ग, सेमी स्किल्ड युवक युवती यांना सूक्ष्म उद्योगांसाठी चालना देऊन केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ सूक्ष्म उद्योगांसाठी प्राप्त करून देणे, प्रोत्साहित करणे, खूप महत्वाचे ठरेल.
उद्योगांचे जाळे निर्माण होणार
बचत गटाची चळवळ चांगले यश मिळवत असताना सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना चालना दिली तर सूक्ष्म उद्योगाचे जाळे निर्माण करता येईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत संकल्प साध्य करण्यासाठी मध्यम उद्योग श्रेणीची व्याख्या व्यापक केली आहे. अनेक आर्थिक योजना मध्यम उद्योजकांसाठी घोषित केल्या आहेत. या सर्व योजनेची अंमलबजावणी करत रत्नागिरीतील युवकांना लघू मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी प्रबोधन करत प्रोत्साहित करून येथे लघू मध्यम उद्योगाचे जाळे निर्माण करण्याचे काम नारायणराव राणे नक्की करतील, असा विश्वास आहे.
राणेसाहेबांकडून रत्नागिरीकरांच्या अपेक्षा
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वरूप पालटणार्या नारायण राणे यांच्याकडून रत्नागिरीतील युवक स्वाभाविक अपेक्षा ठेवून आहेत आणि लोकनेता ही बिरुदावली सातत्याने सांभाळणारे नामदार राणे रत्नागिरीतील युवकांच्या आशा-आकांक्षा फलद्रुप होतील असेच वातावरण निर्माण करतील, असा विश्वास वाटतो. नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्याने रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांना राजाश्रय प्राप्त झाला आहे. रत्नागिरी ते दिल्ली हे अंतर राणे साहेबांच्या मंत्रिमंडळात जाण्याने आकुंचित झाले आहे.
रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे एकतर्फी असलेले प्राबल्य आणि त्यामुळे होणारी फरपट नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्री झाल्याने थांबेल, अशी आशा निर्माण झाली आहे विकासाच्या दृष्टीने दिशाहीन झालेलं धोरण नारायणराव राणे आपल्या कौशल्याने सुधारतील. रत्नागिरीच्या प्रशासनावर शिवसेनेचा असलेला अनिर्बंध अंकुश श्री. राणे यांच्या केंद्रीय मंत्रिपदामुळे नियंत्रणात येईल, एकाधिकारशाहीचा अंत होईल, रत्नागिरीचा विमानतळ, रत्नागिरी- मुंबई महामार्ग, नाणार रिफायनरी प्रकल्प, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आदी प्रकल्प लवकर मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
रत्नागिरी उद्योगनगरी व्हावी
रत्नागिरी हापूस आणि मोसमी फळे मच्छी, पर्यटन या क्षेत्राबाहेर जात लघू, मध्यम उद्योग रत्नागिरीमध्ये सुरू व्हावेत, स्थानिक युवकांना उत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात आणि नारायण राणे साहेबांनी रत्नागिरी लघु मध्यम उद्योगाची नगरी व्हावी यासाठी निर्णय घेत अंमलबजावणी करावी. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत संकल्पना साध्य होत असताना नारायणराव राणे यांची मंत्रीपदी केलेली नियुक्ती औचित्यपूर्ण ठरेल, असेही अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले.