(नवी दिल्ली)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आजचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. दोन दिवसांसाठी शहा नागपूरमध्ये येणार होते. हा दौरा महत्वाचा मानला जात होता. कारण यावेळी ते भाजपच्या पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेणार होते. मात्र, हा दौरा रद्द करण्यात आल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
आज नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. पण अचानक दौरा रद्द झाल्याने आता हा उद्घाटन कार्यक्रम शाह यांच्या उपस्थितीशिवाय पार पडणार आहे. राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा महत्वाचा मानला जात होता. पण अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याने तर्क-वितर्क वर्तवले जात आहेत. हा दौरा रद्द होण्यामागचे कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही.
दरम्यान, अमित शहा काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यांनी नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावली होती. नवी मुंबईतील खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला होता. त्यानंतर पंधरा दिवसांमध्ये ते नागपूरच्या दौऱ्यावर येणार होते. तर प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय दुखवटा असल्याने अमित शहा यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्याचेही बोलले जात आहे.