(नवी दिल्ली)
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होताच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या १८ महिन्यांच्या थकबाकीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केंद्र सरकारकडून मिळणारा महागाई भत्ता आणि महागाई सवलतीबाबत प्रश्न विचारण्यात आले. कोरोनाच्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा १८ महिन्यांचा महागाई भत्ता बंद करण्यात आला. हा भत्ता येत्या काळात मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली. हा डीए एरियर मिळणार नसल्याचे उत्तर सरकारच्यावतीने देण्यात आले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याची तीन हप्त्याची थकबाकी देण्याचा कोणताही विचार नाही. १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात येणारा महागाई भत्ता गोठवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. कोरोना महामारीमुळे झालेल्या आर्थिक विस्कळीतपणामुळे हा निर्णय घेण्यात आला होता, असे सांगण्यात आले.