(नवी दिल्ली)
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोदी सरकारने खूशखबर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्ता (डीए) ४ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के केला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे कोट्यवधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. प्रत्येकवर्षी मार्चमध्ये केंद्र सरकार डीएमध्ये वाढ करते.
केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशभरातील केंद्रीय कर्मचा-यांचा आणि पेन्शनधारकांना आर्थिक फायदा होणार आहे. केंद्रीय कर्मर्चायांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत वाढ करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२३ पासून लागू केला जाईल. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १२,८१५.६० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. या निर्णयाचा फायदा ४७.५८ लाख कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे निश्चित केलेल्या सूत्रानुसार करण्यात आली आहे.