(नवी दिल्ली)
नवीन संसद भवनावर उभारलेल्या अशोकस्तंभातील सिंहाच्या ‘रागीट’ चेहऱ्यावरून केंद्र सरकार मोठ्या वादात सापडले आहे. सरकारने अशोकस्तंभातील डौलदार सिंहांच्या जागी खवळलेल्या, रागीट चेहऱ्याच्या सिंहाची प्रतिकृती उभारली आहे. हा फेरफार करून केंद्राने इतिहासातील सिंहाचे विकृतीकरण केले आहे, असा आरोप करीत विरोधक व इतिहासकारांनी नव्या अशोकस्तंभावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित चूक तत्काळ सुधारावी, अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली आहे.
नवीन संसद भवनाच्या मध्यवर्ती इमारतीवर भव्य अशोकस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. या अशोकस्तंभाचे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला विरोधी पक्षाच्या नेत्यांना न बोलावून पंतप्रधानांनी संवैधानिक नियम धाब्यावर बसवल्याची टीका केली गेली होती. त्यावरून वाद सुरू असतानाच नवीन अशोकस्तंभातील चारही सिंहांच्या डिझाईनवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. नव्या रचनेतील सिंहांनी आक्रमक होऊन तोंड उघडल्याचे दाखवले आहे. वास्तविक, सारनाथमधील मूळ अशोकस्तंभातील सिंहांचे तोंड बंद आहे. केंद्र सरकारने इतिहासामध्ये अशा प्रकारचा फेरफार का केला? असा सवाल विरोधक आणि इतिहासकारांसह सर्व स्तरांतून उपस्थित केला जात आहे. इतिहासकार एस. इरफान हबीब यांनीही नवीन अशोकस्तंभावर आक्षेप घेतला आहे. ‘राष्ट्रीय प्रतीकात फेरफार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपले सिंह उग्र आणि रागीट चेहऱ्याचे का दिसावेत? हे अशोकाचे सिंह आहेत, जे स्वतंत्र भारताने १९५० मध्ये स्वीकारले होते, असे ते म्हणाले.
मोदीजी, सिंहाचा चेहरा निरखून पहा, चूक सुधारा – काँग्रेस
लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले. ‘नरेंद्र मोदी जी, कृपया सिंहाचा चेहरा निरखून पहा. नवीन डिझाईन ग्रेट सारनाथच्या पुतळ्याचे प्रतिनिधित्व करतेय की गीरच्या सिंहाची विकृत आवृत्ती आहे? ते आधी तपासा आणि आवश्यकता वाटल्यास तत्काळ चूक दुरुस्त करा, असा टोला अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधानांना लगावला आहे.