(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाशी तर्फे संगमेश्वर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. दिलीप काळुराम जाधव हे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. गेली ५८ वर्षातली ३८ वर्षे ६ महिने शिक्षण विभागात त्यांनी सेवा बजावली.
तालुक्यातील निवळी या अति दुर्गम गावात त्यांची नियुक्ती १४ नोव्हेंबर १९८४ साली झाली होती. तिथे ५ वर्षे ९ महिने ३० दिवसाची सेवा बजावून पदवीधर म्हणून पदोन्नती घेऊन नांदळज या गावी ६ वर्षे ३ महिने १९ दिवस सेवा बजावली. त्यानंतर उमरे नं. १ शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून तब्बल १५ वर्षे ६ महिने १३ दिवस सेवा बजावली आहे. तसेच सायले गावी ११ महिने २९ दिवसांच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावरून पदोन्नतीने आपल्या मूळ गावी वाशी तर्फे संगमेश्वर येथे केंद्रप्रमुख पदावर ६ वर्षे ११ महिने २७ दिवस सेवा बजावून सेवा निवृत्त झाले.
अतिशय दुर्गम भागात जिथे आजही रहदारीच्या सुविधा नाहीत, मोबाईल चालत नाही अश्या ठिकाणी, अश्या गावातील विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले, जे आज अभियंता, डॉक्टर, वकील इत्यादी पदांवर कार्यरत आहेत. श्री जाधव यांनी ज्या शाळेत स्वतःच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्याच शाळेत केंद्रप्रमुख म्हणून निवृत्त झाल्याचा अभिमान त्यांना असल्याचे ते म्हणाले.
केंद्र वाशी तर्फे संगमेश्वर, बौद्धजन हितवर्धक मंडळ वाशी तर्फे संगमेश्वर तसेच निवृत्त सेवक पतपेढी मार्फत श्री. जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्याला श्री जाधव यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. केंद्रातील शाळांचे शिक्षक, गावातील/वाडीतील स्थानिक मंडळी, पदाधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री. पाटील उपस्थित होते.