तेजा मुळ्ये, रत्नागिरी
आपण त्याना बाजूला ठेवून त्यांचा अंदाज बांधण्यापेक्षा आपण त्या दोन्ही सजग व्यक्तींमध्ये आंतरिक प्रवेश करून पाहिलं तर ? तर काय द्वैताद्वैत सम्पुन एकरूप भाव समजून येईल.
राधा आणि कृष्ण या एकमेकांना पूर्णत्व देणाऱ्या वृत्ती आहेत. परस्पर एकाकी पाहिल्या तरीही त्या पूर्णआकृतीच आहेत. त्यांच्यातील न्यूनत्व दिसतच नाही, कारण ते नाहीच आहे , दोन स्वतंत्र पूर्णआकृती आहेत पण त्या शेजारी आल्या तर सृष्टीचं पूर्णत्व दर्शन होतं. दोघांमध्येही कलासक्ती आहे, नाद,,, स्वर,,, ताल आहे.
यामध्ये वातावरणीय बदल घडवण्याची किमया आहे. राधेकडे पाहून मिश्किल भाव प्रतीत करणारा, लपंडाव खेळणारा खट्याळ, खोडकर कृष्ण हा कधीच तिच्या रागास कारण होत नसून अनुरागास मात्र पूर्ण निमित्त आहे.
सांज शृंगार करून रंग उडवणाऱ्या, मटके फोडून दही – दूध लुटणाऱ्या कृष्णाकडे अनुनयाने पाहणारी राधा कधीच रागे भरीत नाही. राधेने शृंगार नटविला पण त्याला वश करण्याची धडपड केली नाही, तर कृष्णाने राधेचे लाड केलेपण हट्ट पूरवल्याचे दाखले नाहीत.
दोघे एकत्र असताना पूर्ण शृंगारिक आनंदी प्रेमळ अशा त्रयगुणांचा दाखला मिळतो पण एक असेल तर पूर्ण एकच रूप दिसतं एकेरी दर्शनात विरह दग्धता दिसत नाही, म्हणून राधा कृष्ण दोन वृत्ती आहेत पण एकत्र असतील तर विश्वरूप आहेत.
आत्ताच्या आपल्या काळाबरोबर सांगड घालायची तर व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी दोघेही एकमेकांना सकारात्मक राहिले, यातूनच दोन वृत्ती आपला विकास करू शकल्या. दोन्ही वृत्ती आपले वेगळेपण जपत,,, एकमेकांसारखे न होता एकमेकांच्या साठी जगले. एकमेकांना आत्मानंदी करत भोवतालच्या सर्वांसाठी पूर्णानंद दिला.
कोणीकोणास मदत होण्यापेक्षा ते पूरक आहेत. राधेचा अनुराग नसेल तर कृष्णाच्या खोड्यांना अर्थ नाही आणि कृष्णखोड्या नसतील तर राधेच्या अनुरागाला पूर्णत्व नाही. कोणाचाच कोणावर अधिकार नाही, कोणाचीच कोणावर सक्ती नाही पण हे दोन वृत्ती नसतील तर जगातील प्रेमला वाली नाही. ना कसली मागणी, ना कसले वचन, ना कसला अधिकार ,,,,,एकमेकांचा एकमेकाला पूर्ण स्वीकार!